Karnataka Assembly Elections : कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान पार पडले. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीच्या निकालांबाबत मतदानोत्तर चाचण्यांचे कल विविध वाहिन्यांनी जाहीर केले. २२४ सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील किंवा पूर्ण बहुमत प्राप्त होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. तर काही एक्झिट पोलच्या दाव्यानुसार कर्नाटकात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल, असे सांगण्यात आले. अधिकतर एक्झिट पोलचे दावे हे विद्यमान भाजपा सरकारच्या विरोधातले होते. त्यामुळे साहजिकच भाजपा नेत्यांनी एक्झिट पोलचे दावे स्वीकारण्यास विरोध केला. काळजीवाहू मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एक्झिट पोलचे दावे फेटाळले असून भाजपाच पूर्ण बहुमतासह पुन्हा सत्तेत येणार येणार, असे त्यांचे म्हणणे आहे.
एक्झिट पोलची आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर बोम्मई यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, “प्रत्येक एक्झिट पोलमध्ये वेगवेगळे आकडे दाखवले जात आहेत. पण प्रत्यक्ष मतदारांचा आढावा घेतल्यावर कळते की, भाजपाच पुन्हा बहुमताने सत्तेत येईल. एक्झिट पोलची आकडेवारी कधीही तंतोतंत खरी नसते. आपण सर्व १३ मेपर्यंत वाट पाहू, तेव्हा सर्व चित्र स्पष्ट होईलच.” या वेळी रिसॉर्ट पॉलिटिक्स होणार नाही. भाजपाला संपूर्ण बहुमत मिळेल. तसेच जेडीएस यंदा किंगमेकरच्या भूमिकेत नसेल, असेही बोम्मई यांनी स्पष्ट केले.
हे वाचा >> karnataka election 2023 : प्रचार संपला आता मतदान आणि निकालाकडे लक्ष; ‘हे’ मुद्दे ठरवणार कोण जिंकणार?
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते बी.एस. येडियुरप्पा यांनीदेखील एक्झिट पोलचे दावे फेटाळून लावले आहेत. “मी लोकांची नाडी ओळखतो. आम्हाला ११५ हून अधिक जागा मिळतील आणि आम्ही बहुमताने सरकार स्थापन करू. त्रिशंकू विधानसभा होण्याची कोणतीही शक्यता नाही. जेडीएससोबत आघाडी करायची की नाही, याबाबतचा निर्णय राष्ट्रीय नेतृत्व घेईल,” अशी प्रतिक्रिया येडियुरप्पा यांनी दिली.
भाजपाने एक्झिट पोलबाबत सावध पवित्रा घेतला असला तरी काँग्रेसला मात्र या चाचण्यांमुळे आनंद झालेला आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी काँग्रेसच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. मी सुरुवातीपासून सांगत होतो की, काँग्रेस १३०-१५० जागा जिंकणार. मला आशा आहे आहे की निकालामधून आमचा विश्वास सार्थ ठरेल. कर्नाटकच्या सर्व प्रातांतून या वेळी आम्हाला यश मिळेल. समुद्रकिनारपट्टीतील १३ जिल्ह्यांमधून मागच्या वेळेस केवळ एकच विधानसभेची जागा आम्ही जिंकू शकलो होतो, मात्र या वेळी आम्ही अधिक जागा जिंकू अशी आम्हाला आशा आहे, अशी प्रतिक्रिया सिद्धरामय्या यांनी दिली.
बजरंग दलावर बंदी घालण्याच्या मुद्द्यावरून मतदारांवर नकारात्मक प्रभाव पडला का? या प्रश्नावर सिद्धरामय्या म्हणाले, “बजरंग दलावरील बंदी घालण्याची मागणी हा निवडणुकीचा विषय नव्हता. आम्ही आमच्या धोरणांबाबत जाहीरनाम्यात तसे आश्वासन दिले. कारण ज्या ज्या संघटना सांप्रदायिक तणाव किंवा धार्मिक विद्वेषाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करतील त्या त्या संस्था, संघटनांवर आम्ही कारवाई करू, असा त्याचा अर्थ होतो. याबाबतीत कुणाचाही दुजाभाव केला जाणार नाही. मग त्या हिंदुत्ववादी संघटना असोत किंवा मुस्लीम संघटना असोत.”
कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले की, मला एक्झिट पोलवर विश्वास नाही. मी थेट मतदान केंद्रावरून माहिती घेतली आहे. त्यानुसार आम्हाला १४१ जागा मिळतील, असा विश्वास वाटतो. या वेळी त्रिशंकू परिस्थिती किंवा आघाडीचे सरकार स्थापन होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही.
हे ही वाचा >> Karnataka Elections 2023 : कर्नाटकात कोण बाजी मारणार? सर्वच पक्षांनी गुन्हेगार, गडगंज श्रीमंतांना दिली उमेदवारी
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करीत म्हटले की, आमचे बब्बर शेर कार्यकर्ते आणि काँग्रेसचे सर्व नेते यांनी आदर्शवत आणि लोकांच्या भावनांना हात घालणारा अतिशय उत्तम असा प्रचार केला. त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन व्यक्त करतो. तसेच कर्नाटकच्या जनतेने मोठ्या प्रमाणात बाहेर पडून प्रगतिशील भविष्यासाठी मतदान केले, त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो.
२०१८ साली काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेले एच. डी. कुमारस्वामी एक्झिट पोलच्या चाचण्यांवर आत्मविश्वासाने बोलले नाहीत. सर्वच एक्झिट पोलच्या चाचण्यांनुसार जेडीएस २५ जागांच्या आसपासच असेल, अशी शक्यता आहे. एच. डी. कुमारस्वामी यांनी पक्षाच्या आर्थिक अडचणीला यासाठी जबाबदार धरले. पक्षाने काही मतदारसंघासाठी पैसे खर्च केले. मात्र काही जिंकणाऱ्या जागा लढविण्यासाठी आमच्याकडे निधीची कमतरता होती. ज्याचा फटका आम्हाला बसला आहे. ही माझीच चूक आहे, मी माझ्या उमेदवारांना अपेक्षित मदत देऊ शकलो नाही, अशा शब्दात कुमारस्वामी यांनी स्वतःची चूक मान्य केली.