लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यासाठी सोमवारी (ता. २० मे) मतदान होणार आहे. आतापर्यंत चार टप्यांतील मतदान झाले आहे. सोमवारी मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. या मतदानाच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. “उद्या बऱ्याच लोकांची विकेट काढायची आहे”, असे सूचक विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे लोकसभा मतदारसंघातील एका मैदानावर जाऊन क्रिकेट प्रेमींची भेट घेतली. राजकारणाच्या मैदानात जोरदार फटकेबाजी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी क्रिकेटच्या मैदानावरही जोरदार बॅटिंग केली. दरम्यान, सध्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्यामुळे राजकीय नेते एकमेकांवर आरोप करत असताना काही गौप्यस्फोटही करत आहेत.
हेही वाचा : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? शरद पवारांनी सांगितली ठाऊक नसलेली घडामोड, म्हणाले, …
यातच आज शरद पवार यांनी लोकसत्ता लोकसंवादमध्ये बोलताना २०१९ साली शिवसेनेच्या अंतर्गत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होतं. मात्र, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदासाठी सहमती दर्शवण्यात आली. पण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात दिवसभर विविध चर्चा रंगल्या. यानंतर ठाकरे गटानेही यावर प्रतिक्रिया दिल्या. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी अजित पवार आणि सुनिल तटकरे यांचाच विरोध होता, असं संजय राऊत म्हणाले.
यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला सूचक इशारा दिला. ते म्हणाले, “उद्या बऱ्याच लोकांची विकेट काढायची आहे. अनेक लोकांची विकेट काढायची असल्यामुळे आज मी क्रिकेटचा आनंद घेतला. आमचा अजेंडा हा फक्त विकासाचा अजेंडा आहे”, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं. दरम्यान, लोकसभेच्या पाचव्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यासाठी उद्या (ता. २० मे)मतदान होणार आहे. यामध्ये मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर आणि भिवंडी या मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या मतदानाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.