लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना शिंदे गटाचा मेळावा ठाणे लोकसभा मतदारसंघात पार पडला. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. ‘मी जेव्हा ठरवतो तेव्हा करेक्ट कार्यक्रम करतो’, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना दिला. याच मेळाव्यात बोलताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मोठ्या मनाचे माणूस आहेत. त्यांच्या पोटात एक आणि मनात एक असे नाही. ते कोत्या मनाचे नाही तर मोठ्या मनाचे आहेत, असे भाष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

“महायुतीचे सरकार सर्वसामान्य माणसांचे सरकार आहे. आपले सरकार सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याचे काम करते. आपल्या देशाचे नाव अभिमानाने घेतले जाते. ज्यावेळी मी दावोसच्या दौऱ्यावर गेलो होतो. तेव्हा अनेक देशाच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत विचारले होते. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, पंतप्रधान मोदी यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही राज्याचे सरकार चालवतो. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले, त्यावेळी १ लाख ३७ हजार कोटींच्या उद्योग आले होते. त्यातील काम ८० टक्के झाले. त्यानंतर दुसऱ्यावेळी ३ लाख ७३ कोटींचे करार झाले आहे. त्यामुळे आपले राज्य उद्योगस्नेही झाले आहे”, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

हेही वाचा : काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर; वरिष्ठांच्या भेटीनंतर घेतला ‘हा’ निर्णय

“गडचिरोली हा भाग नक्षलवादी भाग आहे. गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव होता. ज्यावेळी मी गडचिरोलीचा पालकमंत्री होतो. तेव्हा सुरजागडचा एक प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी खूप अडचणी आल्या. मुख्यमंत्र्‍यांनीही मला सपोर्ट केला नाही. त्यावेळी डीजी आणि पोलिसांनीही सपोर्ट केला नाही. ते म्हणाले की, हल्ला होईल, नारगरिक मारले जातील. त्यावेळी मी त्यांना सांगितले होते, नक्षल मोठा की सरकार मोठे? जर तुम्हाला प्रकल्प करायचा नसेल तर मी स्वत: तेथे जाऊन प्रकल्प सुरु करेल. त्यानंतर मी तेथे जाऊन प्रकल्प सुरु केला. आज १० हजार लोक त्या ठिकाणी काम करत आहेत”, असे मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले.

“गडचिरोली सारख्या नक्षलवादी भागात आपण काम करु शकलो. कारण हे राज्याचे काम आहे. तेथील नक्षलवाद कमी झाला. काही नक्षलवादी मध्य प्रदेशमध्ये गेले. त्यावेळी काँग्रेसचे सरकार असताना ते त्यांना आश्रय देण्याचे काम करत होते. मात्र, आता मध्य प्रदेशमध्येही भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे ते नक्षलवाद्यांना ठोकून टाकतील”, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले, “माझ्याआधी नरेश म्हस्के यांनी सांगितले की, मी फार प्रेमळ आहे. मी प्रेमळ आहेच. मात्र, ज्यावेळी ठरवतो त्यावेळी करेक्ट कार्यक्रम करतो. दोन वर्षापूर्वी आपण करेक्ट कार्यक्रम केला. आता फक्त विकास आणि विकास हाच आमचा अजेंडा आहे”, असे भाष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde criticizes to uddhav thackeray shivsena crisis in thane politics gkt