Paranda Assembly Constituency Maharashtra Assembly Election 2024: धाराशिव जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष होते. एकतर महाविकास आघाडीकडे हा मतदारसंघ कुणाकडे जाणार? याबद्दल उत्सुकता आहे. २००४ ते २०१४ अशा सलग तीन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते राहुल मोटे याठिकाणी निवडून येत होते. मात्र २०१९ साली शिवसेनेच्या तानाजी सावंत यांनी त्यांचा पराभव केला. याही वेळेला तानाजी सावंत यांचा विजय झाला आहे.
परंडा विधानसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा शिवसेना (शिंदे) पक्षाच्या तानाजी सावंत यांनी विजय मिळविला आहे. प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी १,०३,२५४ एवढी मते मिळवली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार राहुल मोटे यांचा केवळ १५०९ मतांनी पराभव झाला. याच मतदारसंघात राहुल मोटे नावाच्या एका अपक्ष उमेदवाराने ८९० एवढी मते मिळविली. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण राणबागुल यांनी १२,६९८ एवढे मतदान मिळविले. परंडा विधानसभात अपक्षांची संख्याही लक्षणीय होती. त्यामुळे राहुल मोटे यांच्या विजयाचे गणित अवघड झाले, असे म्हणायला वाव आहे.
परंडा विधानसभेचा राजकीय इतिहास?
१९७८ साली निर्मिती झालेल्या या मतदारसंघात जनता पक्षाचे आनंदराव देशमुख निवडून आले. १९८० साली चंदनसिंह सद्दीवाल, तर १९८५ आणि १९९० साली महारुद्र मोटे काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले. त्यानंतर १९९५ आणि १९९९ साली शिवसेनेचे ज्ञानेश्वर पाटील आमदार झाले. २००४ ते २०१४ राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांचे या मतदारसंघावर वर्चस्व होते. जे २०१९ साली तानाजी सावंत यांनी मोडीत काढले.
तानाजी सावंत यांनी महायुतीच्या माध्यमातून २०१९ साली भूम-परंडा विधानसभेत विजय मिळविला असला. तरी आता त्यांच्यासमोर अडचणी उभ्या राहण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमधून तगडा उमेदवार देऊ केल्यास सावंत यांना निवडणूक जड जाऊ शकते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा पणाला
मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार यांच्या पक्षाच्या मंत्र्याच्या शेजारी बसावे लागते. बैठकीतून बाहेर आल्यानंतर मला ओकारी येते, असे विधान मध्यंतरी तानाजी सावंत यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने जोरदार आक्षेप घेतला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य करणे टाळले होते. उलट परंडा मतदारसंघात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून अजित पवार गटाच्या जखमेवर मीठ चोळले. फक्त अजित पवारच नाही, तर भाजपाच्या विरोधातही तानाजी सावंत यांची विधाने आलेली आहेत. २०२२ साली शिवसेनेच्या बंडात एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणाऱ्या तानाजी सावंत यांना निवडून आणण्याचे आव्हान मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर असणार आहे.
हे ही वाचा >> Latur City Assembly Constituency: देशमुख गढीचं यावेळीही लातूरवर वर्चस्व? महायुतीचा उमेदवार कोण?
२०१९ विधानसभा निवडणुकीचा निकाल –
१) तानाजी सावंत (शिवसेना) – १,०५,९९३
२) राहुल मोटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – ७३,१३१
३) सूर्यकांत कांबळे (वंचित) – २७,७४४
परंडा विधानसभेतील उमेदवार कोण?
परांडा विधानसभा मतदारसंघात ७० उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी ५७ जणांचे अर्ज पात्र ठरले आहेत. शिवसेनेच्या तानाजी सावंत यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या राहुल मोटे यांना मैदानात उतरवले गेले आहे. तर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे रणजीत पाटीलही मैदानात आहेत. उबाठा गटाचा उमेदवार अर्ज मागे घेणार की मैत्रीपूर्ण लढत होणार? हे आता ४ नोव्हेंबर रोजीच कळू शकेल. तसेच याही मतदारसंघात राहुल मोटे नामसाधर्म्य असणारा उमेदवार दिला गेला आहे.
ताजी अपडेट
भूम-परंडा विधानसभा मतदारसंघात राहुल मोटे यांना आता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राहुल मोटे यांच्यासाठी प्रचारही केला. त्यामुळे परंड्यात आता धनुष्यबाण विरुद्ध तुतारी असा संघर्ष रंगणार आहे.
तानाजी सावंत यांचा पराभव करण्यासाठी मविआकडून जोर लावण्यात आला आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार अशा नेत्यांसह इतर प्रचारकांच्या सभा भूम-परंडामध्ये झाल्या आहेत. तर सावंत यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध स्टार प्रचारकांनी सभा घेतल्या.
परंडा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी २०० मीटरच्या अंतरावर कुणीही चप्पल घालून येऊ नये, अशी मागणी अपक्ष आमदार गुरुदास कांबळे यांनी लेखी अर्जाद्वारे केली होती. चप्पल ही माझी निशाणी असून कर्मचारी किंवा मतदार चप्पल घालून आल्यास माझा प्रचार होऊ शकतो, असा अर्ज कांबळे यांनी केला होता. मात्र चप्पल ही दैनंदिन वापराची बाब असून त्यावर प्रतिबंध करता येणार नाही, असे सांगून निवडणूक अधिकाऱ्यांनी ही मागणी धुडकावून लावली.
मतदानाच्या दिवशी काय झाले?
परंडा विधानसभा मतदारसंघ हा धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात येतो. धाराशिव जिल्ह्यात ५८.५९ टक्के मतदान झाले आहे. राज्याच्या सरासरीच्या तुलनेत या जिल्ह्यात अतिशय कमी मतदान झाले.
परंडा विधानसभा मतदारसंघात गृह टपाली मतदानाच्या पहिल्या दिवशी ८५ वर्षांमधील ३६६ आणि ७१ दिव्यांग अशा एकूण ४३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
c