Paranda Assembly Constituency: परंडा विधानसभेत तानाजी सावंताबरोबरच मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिष्ठा पणाला; राष्ट्रवादी (दोन्ही) काय करणार?

Paranda Assembly Constituency Maharashtra Assembly Election 2024: धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात २०१९ साली तानाजी सावंत यांनी विजय मिळविला. मात्र त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे ते अडचणीत सापडले आहेत.

Paranda Assembly Constituency MLA Tanaji Sawant Rahul Mote
परंडा विधानसभा मतदारसंघात तानाजी सावंत पुन्हा विजय मिळविणार? (Photo – Loksatta Graphics)

Paranda Assembly Constituency Maharashtra Assembly Election 2024: धाराशिव जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष असणार आहे. एकतर महाविकास आघाडीकडे हा मतदारसंघ कुणाकडे जाणार? याबद्दल उत्सुकता आहे. २००४ ते २०१४ अशा सलग तीन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते राहुल मोटे याठिकाणी निवडून येत होते. मात्र २०१९ साली शिवसेनेच्या तानाजी सावंत यांनी त्यांचा पराभव केला. राहुल मोटे हे शरद पवारांबरोबर राहिल्यामुळे आता दोन्ही पक्षांकडून या मतदारसंघाची मागणी होऊ शकते. त्यातच तानाजी सावंत यांनी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षालाही वादग्रस्त विधानांमुळे अंगावर घेतलेले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या गटाकडून निवडणुकीत काय भूमिका घेतली जाते, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

परंडा विधानसभेचा राजकीय इतिहास?

१९७८ साली निर्मिती झालेल्या या मतदारसंघात जनता पक्षाचे आनंदराव देशमुख निवडून आले. १९८० साली चंदनसिंह सद्दीवाल, तर १९८५ आणि १९९० साली महारुद्र मोटे काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले. त्यानंतर १९९५ आणि १९९९ साली शिवसेनेचे ज्ञानेश्वर पाटील आमदार झाले. २००४ ते २०१४ राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांचे या मतदारसंघावर वर्चस्व होते. जे २०१९ साली तानाजी सावंत यांनी मोडीत काढले.

हे वाचा >> Tuljapur Assembly Constituency: तुळजापूरच्या मातीत कमळ बहरणार की हात पुन्हा पकड घेणार? राणाजगजितसिंह पाटील यांच्यासमोरील आव्हाने काय?

तानाजी सावंत यांनी महायुतीच्या माध्यमातून २०१९ साली भूम-परंडा विधानसभेत विजय मिळविला असला. तरी आता त्यांच्यासमोर अडचणी उभ्या राहण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमधून तगडा उमेदवार देऊ केल्यास सावंत यांना निवडणूक जड जाऊ शकते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा पणाला

मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार यांच्या पक्षाच्या मंत्र्याच्या शेजारी बसावे लागते. बैठकीतून बाहेर आल्यानंतर मला ओकारी येते, असे विधान मध्यंतरी तानाजी सावंत यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने जोरदार आक्षेप घेतला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य करणे टाळले होते. उलट परंडा मतदारसंघात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून अजित पवार गटाच्या जखमेवर मीठ चोळले. फक्त अजित पवारच नाही, तर भाजपाच्या विरोधातही तानाजी सावंत यांची विधाने आलेली आहेत. २०२२ साली शिवसेनेच्या बंडात एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणाऱ्या तानाजी सावंत यांना निवडून आणण्याचे आव्हान मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर असणार आहे.

हे ही वाचा >> Latur City Assembly Constituency: देशमुख गढीचं यावेळीही लातूरवर वर्चस्व? महायुतीचा उमेदवार कोण?

२०१९ विधानसभा निवडणुकीचा निकाल –

१) तानाजी सावंत (शिवसेना) – १,०५,९९३

२) राहुल मोटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – ७३,१३१

३) सूर्यकांत कांबळे (वंचित) – २७,७४४

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cm shindes reputation at stake along with tanaji sawanta in paranda legislative assembly election

First published on: 09-10-2024 at 12:41 IST
Show comments