Madhya Pradesh Assembly Election 2023 : मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. या निमित्ताने विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी द इंडियन एक्स्प्रेसने संवाद साधला. मुख्यमंत्रिपदासाठी चौहान यांचे नाव जाहीर केले काय किंवा न केले काय? याने त्यांच्या काम करण्याच्या शैलीवर कोणताही प्रभाव पडणार नाही, असे उत्तर चौहान यांनी दिले. तसेच त्यांनी लागू केलेल्या योजनांना रेवडी अशी संज्ञा वापरण्यासही त्यांनी विरोध केला. तसेच अयोध्येतील राम मंदिराचे श्रेय भाजपा घेऊ शकत नाही, या कमलनाथ यांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. चौहान यांच्या मुलाखतीचा भाग प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात खालीलप्रमाणे :

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रश्न : भाजपा ही निवडणूक जिंकेल का?

नक्कीच जिंकणार. त्या बाबतीत कोणतीही शंका नाही. मी आजच सांगतो की, आम्हीच जिंकू!

हे वाचा >> Madhya Pradesh : काँग्रेसच्या सौम्य हिंदुत्वाविरोधात भाजपाकडून अयोध्येच्या राम मंदिराचा मध्य प्रदेशात वापर

प्रश्न : तुमच्या कोणत्या योजनेमुळे हे होईल, असे तुम्हाला वाटते?

भावाला मदत करण्यासाठी त्याच्या बहिणी नक्कीच पुढे येतील. लाडली बेहना योजना किंवा लाडली लक्ष्मी योजना, स्थानिक स्वराज संस्थेत ५० टक्के आरक्षण, पोलिस दलात महिलांना ३० टक्के जागा व सरकारी नोकऱ्यांमध्ये ३५ टक्के थेट आरक्षण, अशा पद्धतीचे अनेक निर्णय आम्ही घेतले आहेत. त्यामुळे मातृशक्ती भाजपाच्या पाठीशी आहे आणि भाचा-भाची त्यांच्या मामालाच पाठिंबा देतील.

प्रश्न : पण पंतप्रधान मोदी ‘रेवडी’च्या विरोधात बोलत आहेत. तुमच्या योजना त्यापासून वेगळ्या कशा?

नाही. या योजना रेवडी संस्कृतीपेक्षा वेगळ्या आहेत. समाजातील निम्म्या लोकसंख्येला आम्ही या योजनांच्या माध्यमातून न्याय दिला आहे. आपल्या सर्व संसाधनांवर महिलांचाही बरोबरीचा अधिकार आहे. आपण अजूनही पितृसत्ताक व्यवस्थेत आहोत, हे कुणीही नाकारणार नाही. त्यामुळे महिलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना जे हवे, ते देण्याचा प्रयत्न आम्ही केला. २०१७ साली मी माझ्या भगिनींच्या बँक खात्यांत पैसे पाठविण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोषणाची पातळी सुधारली. ही काही रेवडी नाही. जेव्हा सरकारी निधी कुटुंबातील आई, बहीण आणि मुलीच्या खात्यात जातो, तेव्हा त्या त्याचा योग्य तो विनियोग करतात. त्या सर्वांत आधी आपल्या मुलांच्या गरजा भागवितात. त्यानंतर कुटुंबातील इतर कामांसाठी खर्च करतात. त्यामुळे आईच्या हातात पैसे देणे कधीही चांगलेच. प्रशासनीक व्यवस्थेपेक्षाही त्या त्याचा चांगला वापर करतात.

हे वाचा >> रोकड, सोने, मद्य आणि अमली पदार्थ; निवडणूक होत असलेल्या पाच राज्यात भरारी पथकाच्या हाती लागले मोठे घबाड

प्रश्न : भाजपाचा विजय झाल्यास तुम्ही मुख्यमंत्री व्हाल का?

हे बघा, मी याची अजिबात काळजी करीत नाही. भारताला वैभवशाली, बळकट व समृद्ध करणे हे माझे राजकारणातील ध्येय आहे. ते ध्येय पूर्ण करण्यासाठी मी भाजपाचा साधा कार्यकर्ता असलो तरी काम करीत राहीन. हे ध्येयच कोण, कुठे व कोणते काम करणार हे ठरवेल.

प्रश्न : इतकी वर्षं सत्तेत राहूनही तुम्ही मुख्यंमत्रिपदाचा चेहरा नाहीत, याचे वाईट नाही वाटले?

माझे नाव शिवराजसिंह चौहान आहे आणि अशा छोट्या गोष्टींचा माझ्या व्यक्तिमत्त्वावर किंवा कामावर कोणताही परिणाम होत नाही. तुम्ही काय आहात, हे महत्त्वाचे नाही; तर तुम्ही कसे काम करता हे महत्त्वाचे आहे.

प्रश्न : ज्योतिरादित्य सिंदिया यांच्यामुळे भाजपाचा लाभ होईल?

हो नक्कीच. ते एक तरुण तडफदार नेते आहेत. त्यांच्यामुळे भाजपाला नक्कीच फायदा होईल.

प्रश्न : राम मंदिराचे श्रेय भाजपाने घेऊ नये, असे कमलनाथ यांनी सांगितले आहे. तसेच राजीव गांधी यांनीच बाबरी मशिदीचे टाळे उघडले?

धर्म हा आमच्यासाठी राजकारणाचे साधन नाही; तर ते श्रद्धेचे स्थान आहे. राम मंदिराचा विषयही श्रद्धेचा आहे. राम आमच्यासाठी अस्तित्व, त्याग आणि या देशाच्या प्रतीकाचा विषय आहे. आम्ही त्याच स्वरूपात रामाकडे पाहतो. हा श्रेय घेण्याचा विषय नाही. पण, काँग्रेसने आम्हाला एका प्रश्नाचे उत्तर द्यावे, न्यायालयात लढाई सुरू असताना काँग्रेस नेत्यांनी त्याविरोधात शपथपत्र का दाखल केले? मंदिराला विरोध का केला? “दशरथ यांच्या महालात १० हजार दालने होती, कोणत्या दालनात रामाचा जन्म झाला हे आम्हाला सांगा”, असा प्रश्न काँग्रेस नेते विचारत असतात. काही काळापूर्वी त्यांचे नेते राम काल्पनिक असल्याचे सांगत होते. आता त्यांना कळले की, लोक रामाचे अस्तित्व मानतात. त्यामुळे त्यांनीही रामाची आरती ओवाळण्यास सुरुवात केली. काँग्रेस नेते आता रामाच्या पालखीसमोर नाचायला लागले असले तरी लोकांना सत्य माहीत आहे.

आणखी वाचा >> ‘राजीव गांधी यांनी बाबरीचे कुलूप उघडले होते’, राम मंदिराच्या श्रेयाबाबत कमलनाथ यांनी भाजपाला सुनावले

प्रश्न : कमलनाथ यांनी तुमच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

कमलनाथ यांच्या जवळच्या लोकांवर ईडी आणि प्राप्तिकर खात्याने कारवाई केली आहे, त्याबद्दल ते काय म्हणतात? मी कुणावरही वैयक्तिक आरोप करीत नाही. पण, ते कोणत्या तोंडाने आमच्यावर आरोप करतात?

प्रश्न : कमलनाथ असेही म्हणाले की, भाजपाने शिवराज चौहान यांना मुख्यमंत्रीपदाचा दावेदार घोषित केलेले नाही, यामागे काहीतरी कारण असेल?

कमलनाथ, दिग्विजय सिंह, रणदिप सुरजेवाला किंवा राहुल गांधी जेव्हा केव्हा भोपाळमध्ये येतात, तेव्हा त्यांच्या डोक्यात सकाळ, संध्याकाळ व रात्री सतत माझेच नाव असते. काहीतरी कारण असल्याशिवाय ते उगाच माझे नाव का घेत असतील? ते जेव्हा झोपतात, जेव्हा उठतात आणि ट्विट करतात, तेव्हादेखील त्यात मामाच असतो. मी काहीतरी नक्कीच आहे; ज्यामुळे ते सतत माझे नाव घेत राहतात.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm shivraj singh chouhan interview on madhya pradesh assembly election kvg
Show comments