Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडल्या. राज्यातील सर्वच दिग्गज नेत्यांनी मतदारसंघात पुन्हा एकदा आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कंबर कसली होती. अनेक नेत्यांचे मतदारसंघातील दौरे वाढले असून आढावा घेतला जात होता. खरं तर २०२४ विधानसभा निवडणूक अनेक बड्या नेत्यांसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. आता मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघ देखील राज्याच्या राजकारणात कायम चर्चेस्थानी राहिला. या मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाचे नेते तथा विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) हे आमदार आहेत. गेल्या काही वर्षांत राज्यातील राजकीय समीकरणात झालेल्या बदलानंतर आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कुलाबा विधानसभा मतदारसंघावर यंदा कुणाचा झेंडा फडकणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होत. पण अखेर या निवडणुकीत भाजपाने वर्चस्व राखलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारण विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत होणार आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघात तगडं आव्हान निर्माण झालं आहे. यामध्ये कुलाबा विधानसभा मतदारसंघामध्येही चुरसीची लढत पाहायला मिळत आहे. मुंबईमधील दक्षिण मुंबई हा बहुभाषिक लोकसभा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघात कुलाबा विधानसभा मतदारसंघ येतो. कुलाबा मतदारसंघात उच्चभ्रू लोकांची वस्ती आहे. या परिसरात गुजराती आणि मराठी भाषिक मतदार आहेत. तसेच या मतदारसंघात देखील अनेक प्रश्नांच्या समस्या आहेत. जुन्या चाळींचा प्रश्न, अरुंद रस्ते तसेच वाहतुकीच्या प्रश्नासह आदी समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे हे प्रश्न देखील विधानसभेच्या निवडणुकीत महत्वाची ठरली. यातच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर स्थानिक राजकारणातही राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे याचा काही परिणाम होऊ शकतो. तसेच बदललेल्या राजकीय समीकरणाचा फटका कोणाला बसणार? आणि फायदा कोणाला होणार? हे निकालानंतर पाहायला मिळालं.

हेही वाचा : Vikhroli Assembly constituency : पक्षफुटीचं राजकारण होणार की भाषिक वाद रंगणार? हॅटट्रीकसाठी राऊतांसमोर महायुतीचं आव्हान!

कुलाबा विधानसभा मतदारसंघ सध्याच्या परिस्थितीनुसार, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत झाली. भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान आमदार असलेले ॲड. राहुल नार्वेकर यांनी निवडणूक लढवली आणि त्यांचा विजय झाला. त्यांच्या विरोधातील उमेदवार काँग्रेसच्या हिरा देवसी यांचा पराभव झाला आहे.

कुलाबा मतदारसंघाचं राजकीय गणित कसं आहे?

दक्षिण मुंबईत अर्थात कुलाबा विधानसभा मतदारसंघात भाजपा नेते राज पुरोहित यांचा चांगलाच दबदबा होता. मात्र, २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीनंतर दक्षिण मुंबईत भाजपात दोन गट पडल्याचं बोललं जातं. २००९ व २०१४ मध्ये राज पुरोहित यांना कुलाबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. पण २००९ मध्ये त्यांचा पराभव झाला होता, तर २०१४ मध्ये ते प्रथमच विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज पुरोहित यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र, भाजपाने त्यांचा पत्ता कापत राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली. कुलाबा विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत भाजपाचे राहुल नार्वेकर यांनी विजय मिळवला होता, तर काँग्रेसच्या अशोक अर्जुनराव जगताप यांचा पराभव झाला होता.

२०१९ च्या मतदारांची संख्या

मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघ २०१९ च्या निवडणुकीमध्ये भाजपाने जिंकला होता. राहुल नार्वेकर यांनी काँग्रेसचे अशोक अर्जुनराव जगताप यांचा पराभव केला होता. कुलाबा मतदारसंघामधून २०१९ मध्ये राहुल नार्वेकरांना ५७ हजार ४२० मते मिळाली होती, तर काँग्रेसचे अशोक जगताप यांना ४१ हजार २२५ मते मिळाली होती. २०१९ च्या निवडणुकीत एकूण २,६५,४७० मतदार होते. त्यापैकी १ लाख ५४ हजार ३८४ पुरुष, तर १ लाख ११ हजार ८६ महिला मतदार होते.

२०२४ च्या निवडणुकीत सर्वाधिक कमी मतदान कुलाब्यात

मुंबईतील सर्वाधिक कमी मतदान कुलाबा मतदारसंघात झालं आहे. गेल्या निवडणुकीत देखील कुलाबा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं होतं. या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत देखील सर्वात कमी मतदान झालं आहे. मात्र मागील निवडणुकीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार कुलाबा मतदारसंघात ४४.४९ टक्के मतदान झालं आहे.

कोण आहेत राहुल नार्वेकर?

राहुल नार्वेकर यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये विविध पदांवर काम केलेले आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे राहुल नार्वेकर यांचे सासरे आहेत. व्यवसायाने वकील असणाऱ्या राहुल नार्वेकर यांनी सुरुवातीला शिवसेनेत काम केले. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राहुल नार्वेकर यांना विधान परिषदेवर पाठवले. २०१४ ते २०१९ या काळात ते विधान परिषदेचे सदस्य होते. सप्टेंबर २०१९ मध्ये राहुल नार्वेकर यांनी भाजपामध्ये प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला. ते भाजपाचे माध्यम प्रभारीही (मीडिया इन्चार्ज) राहिले आहेत. २०१९ मध्ये कुलाबा विधानसभा मतदारसंघातून नार्वेकर आमदार झाले.