विनोदी कलाकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करून प्रसिद्ध झालेला श्याम रंगीला याने वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्याचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. रंगीला याने प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे त्याचा अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने १४ मे ही अंतिम तारीख जाहीर केली होती. याच दिवशी श्यामने त्याचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता, जो निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला आहे. वाराणसीत लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे.
श्याम रंगीला याला उमेदवारी अर्ज भरतानादेखील अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. “वारासणीत उमेदवारी अर्ज घेण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. अनेक तास रांगेत उभा राहिल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी मला आधार कार्ड आणि दहा प्रस्तावक (त्यांच्या स्वाक्षरीसह) आणि त्यांचे फोन नंबर आणण्यास सांगितले. त्यानंतरच अर्ज विकत घेण्यासाठी पावती दिली जाईल”, अशी एक पोस्ट श्यामने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केली होती.
श्याम रंगीला कोण आहे?
श्याम रंगीला हा मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या टीव्हीवरील विनोदी कार्यक्रमाद्वारे तो प्रसिद्धिझोतात आला. या कार्यक्रमात तो वेगवेगळ्या सेलिब्रिटींची नक्कल करायचा. २०१७ साली पंतप्रधान मोदी यांच्यासारखा आवाज आणि बोलण्याची शैली विकसित करून त्याने प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर श्याम रंगीलाने वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोदींच्या मिमिक्रीचा धडाका लावला. वेगवेगळे राजकीय विषय घेऊन त्याने मोदींवर टीका-टिप्पणी करणारे खुसखुशीत व्हिडीओ तयारून करून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वरवर उपरोधिक वाटणारे हे व्हिडीओ पंतप्रधान मोदींच्या धोरणांवर टीका करणारे असतात. त्यामुळे त्याला अनेकदा भाजपा कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. देशात पेट्रोलच्या किंमतींनी शंभरी पार केल्यानंतर श्याम रंगीलाने थेट पेट्रोल पंपावर जाऊन पंतप्रधान मोदींच्या फलकासमोर उभा राहून त्यांच्या आवाजात एक व्हिडीओ तयार केला होता. पेट्रोल पंपावर जाऊन त्याने मोदींच्या जुन्या घोषणा आणि आश्वासनांची आठवण करून दिली होती. श्यामने खूप धाडसाने हा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओला खूप लोकप्रियता मिळाली होती.
हे ही वाचा >> “नकली राष्ट्रवादी, शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार”, मोदींच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले, “मी सुचवलेलं की…”
मोदींविरोधात आठ अपक्ष उमेदवार
वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात अनेक अपक्ष उमेदवार उभे राहिले आहेत. विनय कुमार त्रिपाठी, नारायण सिंह, दिनेश कुमार यादव, रीना राय, नेहा जयस्वाल, अजीत कुमार जयस्वाल, अशोक कुमार पांडेय, संदीप त्रिपाठी अशी मोदींविरोधातील अपक्ष उमेदवारांची नावं आहेत. यासह काँग्रेसने अजय राय यांना येथून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे.