Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघासाठी १० मे रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (१३ मे) होत आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून अवघ्या देशाचं लक्ष या मतमोजणीकडे राहिलं आहे. प्रत्येक निवडणुकीत सत्ताबदल होण्याची कर्नाटकची ३९ वर्षांची परंपरा आहे. ही परंपराही यंदाही कायम राहतेय की खंडित होऊन भाजपा पुन्हा सत्तेवर येईल? याकडे सर्वांचं लक्ष आहे. यादरम्यान, कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसने पहिली खेळी खेळली असून काँग्रेसच्या सर्व आमदारांना बंगळुरूत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
१० मे रोजी मतदानप्रक्रिया पार पडल्यानंतर मतदानोत्तर निष्कर्ष चाचण्यांमध्ये काँग्रेसचे पारडे जड झाले होते. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येण्याचा दावा करण्यात आला होता. सध्या मतमोजणीचे हाती येत असलेल्या कलांनुसार काँग्रेस आघाडीवर आहे. त्यामुळे संभाव्य परिस्थिती लक्षात घेता काँग्रेसच्या सर्व आमदारांना एकत्र बोलावण्यात आले आहे. आमदार फुटू नयेत म्हणून आमदारांना एकत्रित ठेवण्याचा नियम आहे. त्यानुसार, काँग्रेसनेही त्यांच्या सर्व आमदारांना बंगळुरूत एकत्र बोलावले आहे. आमदारांना बंगळुरूत नेण्याकरता विशेष व्यवस्था करण्यात आळी आहे. तसंच, यासाठी विशेष निरिक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असून मतमोजणी आधीच काँग्रेसमध्ये फूट पडली असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत होता. परंतु, हा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी फेटाळून लावला आहे. “कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने जनतेला पाच प्रमुख आश्वासनं दिली आहेत. या आश्वासनांची अंमलबजावणी कशी करायची? याबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही बैठका घेत आहोत. कारण ज्या पद्धतीने ‘एक्झिट पोल’समोर आले आहेत, त्यानुसार उद्या ६ कोटी कन्नाडिगा जिंकणार आहेत, असा आम्हाला विश्वास आहे. हा विजय त्या सर्व लोकांचा आहे, ज्यांनी ४० टक्के भ्रष्टाचाराला हरवलं आणि काँग्रेसच्या पाच आश्वासनांवर विश्वास ठेवला. या पाच योजनांची अंमलबजावणी कशी करायची? यासाठीच आम्ही बैठका घेत आहोत. कर्नाटकच्या लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिला आहे. उद्या कर्नाटकच्या नवीन भविष्याचा पहिला सूर्यकिरण उगवणार आहे.”
काँग्रेसच्या उमेदवारांना रिसॉर्टवर ठेवण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात रंगली होती. परंतु, हा दावा काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी फेटाळून लावला आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांना म्हणाले की, “आम्ही आमचं काम करतोय. निकाल येईपर्यंत वाट पाहा.”