आज लोकसभा निवडणुकांच्या निकालाची घोषणा केली जाणार आहे. थोड्याच वेळात मतमोजणी सुरू होणार आहे. एकीकडे भाजपा कार्यालयाबाहेर जिंकण्याचा विश्वास दाखवत कार्यकर्ते मिठाई बनवत जल्लोषाची तयारी करत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसकडून मात्र इव्हीएमच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अशातच आता महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.

इंडिया आघाडीला अपेक्षित जागा मिळाल्या नाही तर…

निकालांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्लीतच राहण्यास सांगण्यात आलं आहे. काँग्रेसने इंडिया आघाडीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना उद्या रात्री किंवा परवा सकाळपर्यंत दिल्लीत राहण्यास सांगितलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. निवडणूक निकालानंतर इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. अपेक्षेनुसार इंडिया आघाडीला जागा जिंकता आल्या नाहीत, तर निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करता येतील अशा पर्यायांची चाचपणी होणार आहे. यात पत्रकार परिषद, राष्ट्रपतींबरोबर बैठक यासह इतर काही पर्यायांवर चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती एएनआयने काँग्रेसच्या सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live Updates : महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाला? ‘एनडीए’ की ‘इंडिया’

आज निवडणुकांच्या निकालाच्या दिवशीही काही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत घोषणाबाजी करत आहेत. अशातच ईव्हीएमवर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर राजस्थानमधील जयपूर मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार प्रताप सिंह खाचरियावास यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईव्हीएमवर जर इतके प्रश्न उपस्थित केले जात असतील तर निवडणूक आयोगाने ईव्हीएम लोकांसमोर ठेवायला पाहिजे, असं त त्यांनी मांडलं.

प्रताप सिंह खाचरियावास काय म्हणाले?

“जर ईव्हीएमवर इतके प्रश्न उपस्थित होत असतील, तर निवडणूक संपल्यावर निवडणूक आयोगाने पुढे येऊन ते एका हॉलमध्ये ठेवायला पाहिजे. त्यानंतर तिथे सुरक्षा पुरवत ज्या कुणाला ईव्हीएम हॅक करायचे आहेत, त्यांना करू द्यायला पाहिजे. ईव्हीएममध्ये प्रोग्रामिंग कोण अपलोड करतंय? तुम्ही उमेदवारांना तुम्ही उमेदवारांना तेच प्रोग्रामिंग देत नाही, याबद्दल चर्चाही होत नाही. हा कार्यक्रम उमेदवारांना उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने द्यायला पाहिजे. पण निवडणूक आयोगाला हे करायचं नाहीये, पण त्यांनी हे करावं जेणेकरून सत्य बाहेर येईल. निवडणूक आयोग हे का करत नाही? निवडणूक आयोग पारदर्शक असायला हवा. निवडणूक आयोगाने हॅक करणाऱ्याला बक्षीस जाहीर केले पाहिजे आणि जर कोणी ते हॅक करू शकले तर ते बदलायला पाहिजे,” असं प्रताप सिंह खाचरियावास म्हणाले.