सध्या देशभरात राजकीय वर्तुळामध्ये ५ राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा आहे. यामध्ये उत्तर प्रदेशसह पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांचा समावेश आहे. देशातील भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी उत्तर प्रदेशमधील निवडणूक विशेष प्रतिष्ठेची केलेली असताना आता काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश आणि इतर चार राज्यांमधला विधानसभा निवडणुकांसाठीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना आता काँग्रेसनं उचललेलं हे पाऊल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलं आहे.
पाचही राज्यांमधल्या सर्व महत्त्वाच्या प्रचारसभा पुढे ढकलण्याचा निर्णय काँग्रेसकडून जाहीर करण्यात आला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल राव यांनी एएनआयशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली आहे. “काँग्रेसनं उत्तर प्रदेश आणि इतर चारही राज्यांमधल्या सर्व महत्त्वाच्या प्रचारसभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्या त्या राज्यांमघील स्थानिक नेत्यांना निर्देश देण्यात आले आहेत. कोविड-१९ संदर्भातल्या परिस्थितीचा आढावा घेऊन प्रचारसभा घेण्याचा निर्णय घावा, असे निर्देश दिले आहेत”, अशी माहिती वेणुगोपाल राव यांनी दिली आहे.
बरेलीमध्ये नेमकं काय घडलं?
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे पक्षानं हा निर्णय घेतल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. बरेलीमध्ये काँग्रेसच्या स्थानित नेत्या आणि माजी महापौर सुप्रिया अॅरॉन यांनी आयोजित केलेल्या मॅरेथॉनमध्ये मओठी दुर्घटना थोडक्यात टळली.
मॅरेथॉन सुरू करण्याचा इशारा होताच या महिला आणि मुलींनी धावायला सुरुवात केली. पण काही क्षणाच पुढच्या काही मुली खाली पडल्या. त्यांच्या मागून शेकडो मुली आणि महिला धावत येत होत्या. मागून घाई आणि धक्का दिल्यामुळे या मुली पडल्या. वेळीच आयोजकांपैकी काही सदस्य मध्ये आले आणि त्यांनी खाली पडलेल्या मुलींना पुन्हा उचलून उभं केलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मागून येणाऱ्या शेकडो स्पर्धकांमुळे पुन्हा एकदा देशात चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडू शकली असती. या घटनेमध्ये काही मुली जखमी देखील झाल्या.
काँग्रेस टीकेच्या केंद्रस्थानी!
दरम्यान, या घटनेनंतर काँग्रेसवर टीका केली जाऊ लागली होती. याचदरम्यान देशात मोठ्या संख्येनं करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे निवडणुकाच पुढे ढकलण्याची मागणी केली जाऊ लागली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून सर्व महत्त्वाच्या प्रचारसभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.