Vinesh Phogat Julana Assembly Election Result 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अखेरच्या सामन्यात केवळ वजन वाढल्यामुळे अपात्र ठरल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगटने काँग्रेसमध्ये प्रवेश करत हरियाणा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसने तिला जुलाना विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केले असून तिने या मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात विनेश फोगटने आपली संपत्ती, कर्ज याबद्दल माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विनेश फोगटची संपत्ती किती?

राष्ट्रकुल स्पर्धेत अनेकवेळा सुवर्णपदक जिंकणाऱ्या विनेश फोगटने आपल्या प्रतिज्ञापत्रात तीन चारचाकी वाहने असल्याचे नमूद केले आहे. तसेच एका वाहनासाठी कर्ज काढले असून ते अद्याप भरायचे असल्याचेही सांगितले आहे. विनेशकडे ३५ लाख रुपयांची व्होल्वो एक्ससी ६०, १२ लाखांची ह्युडांइ क्रेटा आणि १७ लाखांची टोयोटा इनोव्हा अशा तीन गाड्या आहेत. इनोव्हा गाडी घेताना १३ लाखांचे कर्ज काढले असून ते अद्याप भरायचे असल्याचे म्हटले आहे.

हे वाचा >> Vinesh Phogat Join Congress: विनेश फोगट, बजरंग पुनियाच्या काँग्रेस प्रवेशामुळे सत्ताधारी भाजपाला धक्का; हरियाणात सत्तांतार होणार?

विनेश फोगटचा पती सोमवीर राठीकडे १९ लाखांची महिंद्रा स्कॉर्पियो गाडी आहे. स्थावर मालमत्तेमध्ये विनेशकडे सोनीपत याठिकाणी दोन कोटी रुपयांचा एक प्लॉट आहे. तसेच प्रतिज्ञापत्रात म्हटल्याप्रमाणे मागच्या आर्थिक वर्षात विनेश फोगटचे वार्षिक उत्पन्न १३ लाख ८५ हजार इतके होते. तर पती सोमवीरचे वार्षिक उत्पन्न ३ लाख ४४ हजार रुपये इतके आहे.

तर जंगम मालमत्तेपैकी दागिने, गुंतवणूक, बँकेतील शिल्लक असे मिळून एकूण एक कोटी १० लाख रुपये आहेत. विनेशकडे ३५ ग्रॅम सोने असून त्याचे बाजारमूल्य २ लाख २४ हजार इतके आहे. तसेच चांदी ५० ग्रॅम असून बाजार भावानुसार त्याची किंमत साडे चार हजार रुपये एवढी होते.

चिंता करू नका, तुमची मुलगी येतेय

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मिरवणूक काढून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. या मिरवणुकीत भाषण करत असताना विनेश फोगट म्हणाली, “खेळाच्या मैदानात तुम्ही सर्वांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. आता मी एका नव्या क्षेत्रात प्रवेश करत आहे. मी विधानसभेत मी जनतेचा आवाज बनण्याचा प्रयत्न करेन. महिला, वृद्ध, मातांना मी आश्वासन देऊ इच्छिते की तुम्ही आता चिंता करू नका, तुमची मुलगी येत आहे.”

हे वाचा >> Vinesh Phogat on PT Usha: “पीटी उषा यांनी गुपचूप फोटो घेतला आणि त्यानंतर राजकारण…”, विनेश फोगटचा मोठा आरोप

पीटी उषा यांनी मदत केली नाही

दरम्यान हरियाणात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विनेश फोगटने भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांच्यावर आरोप केले. विनेश फोगट म्हणाली, ऑलिम्पिकमध्ये वजन अधिक भरल्यानंतर जो गोंधळ निर्माण झाला, त्यादरम्यान पीटी उषा यांनी कोणतीही मदत केली नाही. मात्र नंतर त्यांनी सोशल मीडियावर असा भास निर्माण केला की, त्या खेळाडूंच्या पाठिशी आहेत. “मला ऑलिम्पिकमध्ये कोणते सहकार्य मिळाले, हा प्रश्न आता पडला आहे. पीटी उषा मला भेटायला आल्या, त्यांनी एक फोटो घेतला आणि त्यानंतर बंद दाराआड राजकारण शिजले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बरेच राजकारण घडले. त्यामुळेच मला खूप धक्का बसला. अनेक लोक मला म्हणतात की, कुस्ती सोडू नको. पण कोणत्या कारणासाठी मी कुस्ती सुरू ठेवायची? प्रत्येक क्षेत्र आता राजकारणाने व्यापले आहे.”

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress candidate vinesh phogat owns three cars cash in hand and much more now her election affidavit kvg