Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बहुमताच्या जवळ किंवा बहुमत गाठेल असे चित्र दिसत आहे. मात्र विजय मिळवूनदेखील काँग्रेसमोर काही जटिल प्रश्न उभे ठाकणार आहेत. काँग्रेसचा विजय झाला तरी कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार? प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार की माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या? निकालाच्या पूर्वसंध्येला म्हणजे शुक्रवारी काँग्रेस नेत्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक घेतली. किती जागांवर विजय मिळू शकतो, या विषयावर बैठकीत चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी कनकपुरा येथील आपल्या घरून बंगळुरूकडे काल रात्रीच प्रस्थान केले. बंगळुरूमध्ये त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन चर्चा केली. सिद्धरामय्या काल रात्री म्हैसूर येथे जाण्यासाठी निघणार होते, मात्र त्यांना बंगळुरूमध्येच थांबण्यास सांगितले.
काँग्रेसने आपल्या प्रचारात भाजपाच्या काळातील भ्रष्टाचारावर कोरडे ओढले होते. प्रचाराचा रोख हा पूर्णवेळ विकास आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांभोवती केंद्रित ठेवल्यामुळे लोकांचाही त्याला चांगला पाठिंबा मिळाला. त्यामुळे सकारात्मक निकाल पाहायला मिळेल, असे काँग्रेसचे आडाखे आहेत. या निकालाबाबत पाच महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊ या.
१. जर काँग्रेसच्या विजयी जागा १२५ च्या वर गेल्या आणि भाजपा ८० च्या खाली रोखला गेला तर काँग्रेसचा पाच वर्षे सत्तेवर राहण्याचा मार्ग कोणत्याही अडथळ्याविना पार पडेल. मात्र त्यानंतरही पक्षाला सिद्धारामय्या की डीके शिवकुमार हा प्रश्न सोडवावा लागणार आहे. दोघांनीही मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. कर्नाटकमधून अशीही माहिती येत आहे की, दोन्ही नेत्यांनी आपापल्या समर्थक आमदारांसह गट बनविण्यास सुरुवात केली आहे.
२. जर काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आणि बहुमत गाठण्यापासून हुकला तर मग मागच्या वेळेसारखे जेडीएसला पाठिंबा देण्याशिवाय काँग्रेसला पर्याय उरणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेडीएसचे कुमारस्वामी आघाडी करण्यासाठी तयार आहेत, मात्र मुख्यमंत्रीपद कुमारस्वामी यांना मिळावे, अशी त्यांची अट आहे. मात्र ही बाब सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना खटकणारी आहे. काँग्रेसमध्ये या दोघांशिवाय जी. परमेश्वरा, एच. के. पाटील आणि आर. व्ही. देशपांडे यांच्यासारखे नेते आहेत.
३. समजा काँग्रेसने १०० हून अधिक जागा मिळवल्या नाहीत. त्यांना ८० किंवा ९० च्या आसपास जागा मिळाल्या तर मग भाजपाला सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. जेडीएस आणि अपक्ष आमदारांना घेऊन भाजपा सत्ता स्थापन करेल.
४. कर्नाटकमध्ये विजय झाल्यास पुढल्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला एक नवी ऊर्जा नक्कीच मिळेल. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनाही याचा लाभ मिळेल. सुरजेवाला मागच्या एक ते दीड वर्षापासून कर्नाटकात ठाण मांडून बसले आहेत.
५. काँग्रेसने या वेळी भाजपामधील नाराज असलेल्या मोठ्या नेत्यांसाठी पक्षाचे दरवाजे खुले केले. यामध्ये लिंगायत नेते आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांचा समावेश आहे. या दोन नेत्यांमुळे लिंगायत मते काँग्रेसच्या बाजूने वळत आहेत का? याचाही अभ्यास केला जाईल. लिंगायत मते हा भाजपाच्या विजयाचा पाया असतो, हा पाया खच्ची करण्याचे काम काँग्रेसने या वेळी केले आहे का? हे निकालामधून दिसून येईल.