पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित चन्नी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाचार घेतला. एका राज्यातील रहिवाशांची दुसऱ्या राज्यातील रहिवाशांशी भांडणे लावणे हेच काँग्रेसचे काम आहे. या पक्षाचे नेते विभाजनवादी विचारसरणीचे असून त्यांना एखाद्या राज्यात सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका मोदी यांनी केली.
पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचारसभेत मंगळवारी चन्नी यांनी उत्तर प्रदेश व बिहारचे रहिवासी भय्या म्हणजेच स्थलांतरित असून पंजाबवर त्यांना राज्य करू देणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
चन्नी यांनी हे वक्तव्य केले, त्यावेळी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा या व्यासपीठावर उपस्थित होत्या आणि चन्नी यांच्या भाषणावर टाळय़ा वाजवत होत्या. यावरही मोदी यांनी टीकास्त्र सोडले. ‘‘पंजाबचे मुख्यमंत्री वादग्रस्त विधान करतात आणि त्यांच्या नेत्या त्यांना अडवण्याच्या ऐवजी त्यांच्या वक्तव्यावर टाळय़ा वाजवत आहेत,’’ असे मोदी म्हणाले. पंजाबमध्ये क्वचितच असे गाव असेल, जिथे उत्तर प्रदेश व बिहारमधून आलेले आमचे बांधव कठोर परिश्रम करत नसतील. मात्र अशा प्रकारची अवमानकारक वक्तव्ये त्यांच्याबाबत केली जातात.
संत रविदास यांची जयंती बुधवारी साजरी करण्यात आली. हा धागा पकडून पंतप्रधान म्हणाले, ‘संत रविदास यांचा जन्म कुठे झाला होता? ते पंजाबमध्ये जन्मले होते काय?.. उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये त्यांचा जन्म झाला. संत रविदास यांचे अनुयायी असलेल्या समाजालाही तुम्ही ‘भय्या’ म्हणणार का? तुम्ही संत रविदास यांचे नाव पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहात,’’ असे मोदी यांनी सांगितले.
गुरू गोविंदसिंग यांचा जन्म बिहारमधील पाटनासाहिब येथे झाला आणि तुम्ही बिहारी जनतेला प्रवेश नाकारता. तुम्ही गुरू गोविंदसिंग यांच्या जन्मभूमीचा अवमान करत आहात, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांविरोधात बिहारच्या न्यायालयात याचिका
मुझफ्फरपूर : उत्तर प्रदेश आणि बिहारच्या रहिवाशांचा उल्लेख ‘भय्या’ असा केल्याने अडचणीत सापडलेल्या पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्याविरोधात बिहारमधील मुझफ्फरपूर न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्त्यां तमन्ना हाशमी यांनी मुझफ्फरपूरच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ‘पंजाबमधील बिहारी रहिवाशांचे जीवन धोक्यात आहे, असे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यांवरून दिसून येते,’ असे या याचिकेत म्हटले आहे. चन्नी यांनी केलेले हे वक्तव्य जाणीवपूर्वक बिहारी रहिवाशांचा अवमान करण्यासाठी केलेले आहे, असे तमन्ना यांनी सांगितले. चन्नी यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नितिश कुमार, केजरीवाल यांची टीका
पाटणा : पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्या विधानाचा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही समाचार घेतला. ‘चन्नी यांचे वक्तव्य मूर्खपणाचे आहे. बिहारी रहिवाशांनी पंजाबची किती सेवा केली आहे, हे चन्नी यांना माहीत नाही,’ अशी टीका नितीश कुमार यांनी केली. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनीही चन्नी यांच्यावर टीका केली. चन्नी यांनी अशा प्रकारचे विधान करणे लाजीरवाणे आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली.
‘माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ’
वादग्रस्त विधानाबाबत सार्वत्रिक टीका होत असल्याने चरणजित चन्नी यांनी स्पष्टीकरण दिले. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आह़े उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यांतून आलेल्या स्थलांतरितांनी अपार कष्ट करून पंजाबला विकासाच्या मार्गावर नेले आहे, असे चन्नी म्हणाले. बाहेरून येऊन येथे अडथळे निर्माण करणाऱ्या लोकांबाबत माझे विधान होते, असे चन्नी यांनी सांगितले.