Indore Indore Lok Sabha Constituency इंदूर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. या प्रकरणाची चर्चा रंगलेली असतानाच मध्यप्रदेश काँग्रेस नेते जितू पटवारी यांनी भाजपाने अक्षय बम यांना धमकावल्याचा आरोप केला आहे.
काय म्हणाले जितू पटवारी?
“अक्षय क्रांती बम यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली याचं कारण भाजपाने त्यांना धमक्या दिल्या आणि त्यांचा छळ केला. त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी भाग पाडलं गेलं. तीन दिवसांपूर्वी त्यांच्याविरोधातल्या एका केसमध्ये ३०७ हत्येचं कलम लावण्यात आलं. तसंच त्यांचा रात्रभर छळ करण्यात आला. त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी भाग पाडलं गेलं. ” असा आरोप पटवारी यांनी केला आहे. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे.
कैलाश विजयवर्गीय यांनी काय म्हटलं होतं?
कैलाश विजयवर्गीय यांनी अक्षय बम यांच्यासह सेल्फी काढत तो शेअर केला. सोशल मीडियावर या बातमीची चर्चा रंगली आहे. इंदूर काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांति बम यांचं भाजपात स्वागत आहे. पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नडड्डा यांच्या नेतृत्वातल्या भाजपाचं कमळ त्यांनी हाती घेतलं त्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करतो या आशयाच्या ओळीही विजयवर्गीय यांनी लिहिल्या आहेत.
हे पण वाचा- सूरतनंतर आता भाजपाचा इंदूरमध्ये ‘खेळ’, काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांति बम यांची माघार, हाती घेतलं कमळ
नेमकं काय घडलं?
इंदूर लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरण्याची तारीख २५ एप्रिल होती आणि मागे घेण्याची तारीख आजची म्हणजेच २९ एप्रिलची होती. त्याआधीच कैलाश विजय वर्गीय यांनी खास मोहीम राबवली आणि काँग्रेसच्या उमेदवारालाच पक्षात घेतलं. इंदूरमध्ये १३ मे रोजी मतदान पार पडणार आहे. तर ४ जूनला निकाल लागणार आहे.
सूरतमध्ये काय घडलं होतं?
काही दिवसांपूर्वी सूरत लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांना निकालापूर्वीच बिनविरोध विजेते उमेदवार असं जाहीर करण्यात आलं होतं. कारण त्यांचे प्रतिस्पर्धी निलेश कुंभानी यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. काँग्रेसने तोडकं मोडकं स्पष्टीकरण दिलं पण काही उपयोग झाला नाही. त्यामुळे मुकेश दलाल लोकसभेचा निकाल लागण्याआधीच बिनविरोध निवडले गेल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. आता तशीच घटना मध्यप्रदेशातही घडल्याचं दिसून येतं आहे. या प्रकरणी भाजपाने अक्षय बम यांचा छळ केला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.