रामदास तडस आणि नवनीत राणांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्ध्यात सभा घेतली. वर्ध्यातल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना काँग्रेसची इतकी केविलवाणी अवस्था कधी पाहिली नव्हती असं म्हटलं आहे. तसंच मोदींनीही या सभेत भाषण करत काँग्रेसवर टीका केली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मला विश्वास आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने रामदास तडस हॅटट्रीकची संधी मिळेल. अमरावतीत आमच्या नवनीत राणा ज्या उद्धव ठाकरेंच्या काळात हनुमान चालीसा म्हटली म्हणून १२ दिवस जेलमध्ये राहिल्या. त्या नवनीत राणा आहे. अजूनही शिवसेनेचे नेते, काँग्रेसचे नेते येऊन महिलांबद्दल नवनीत ताईंबद्दल जे उद्गार काढत आहेत मी आता ठामपणे सांगतो आमच्या महिलाच यांना उत्तर देतील. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसची इतकी केविलवाणी अवस्था…
महात्मा गांधींनी सांगितलं होतं देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे काँग्रेस पक्ष विसर्जित केला. काँग्रेसवाल्यांनी ऐकलं नाही. मात्र वर्धेकरांनी ऐकलं आणि काँग्रेस संपवायला सुरुवात केली. तरीही काँग्रेस वर्ध्यात शिल्लक होती. मात्र शरद पवारांचे आभार मानतो, कारण त्यांनी वर्ध्यातून काँग्रेस पक्ष विसर्जित केला. वर्धा हे काँग्रेसमुक्त झालं आहे, शरद पवारांनीच ते केलं. काँग्रेसची इतकी केविलवाणी अवस्था यापूर्वी कधीही पाहिली नव्हती ती आता पाहायला मिळते आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी नागपुरात केलं मतदान | LoksabhaElection2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटच्या माणसापर्यंत सगळ्यांना न्याय दिला
मोदींच्या नेतृत्वात दीन, दलित, गोर-गरीब, आदिवासी, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक यांच्या आयुष्यात मुलभूत परिवर्तन झालं. देशात ओबीसींचा विचार कुणी केला? तर तो मोदींनी केला. मोदींचं पहिलं मंत्रिममंडळ असं आहे ज्यात ६० टक्के लोक ओबीसी, एससी आणि एसटी आहेत. पहिल्यांदा सामाजिक न्याय शेवटच्या माणसापर्यंत न्यायचं काम मोदींनी केलं. बारा बलुतेदारांसाठी ३० हजार कोटींची योजना आणली. आदिवासींसाठी २४ हजार कोटींची योजना आणली असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. सगळ्या समाजाला बरोबर घेऊन मोदी पुढे चाललं आहे. आपल्या सगळ्यांचं ठरलं आहे अब की बार ४०० पार असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.