सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या कलांनुसार एनडीए आणि इंडिया आघाडीत चुरशीची लढत होताना दिसत आहे. लोकसभेत काँग्रेसला १०० च्या जवळपास जागा मिळाल्यामुळे आणि इंडिया आघाडी व एनडीएमध्ये केवळ ५० जागांचा फरक असल्यामुळे आता मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदेंपासून ते चंद्राबाबू नायडूंसारख्या नेत्यांपर्यंत पोहोचण्याचे काम पडद्याआड होत आहे. त्यामुळे भाजपाच्या साथीला असलेले पक्ष या गोटातून त्या गोटात उडी मारण्याची शक्यता आहे, असे वृत्त ‘हिंदुस्तान टाईम्स’ने दिले आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोक जनशक्ती पक्ष (राम) व्यतिरिक्त चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टी (टीडीपी), नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) आणि नवीन पटनाईक यांच्या बिजू जनता दल (बीजेडी) यांच्याशी संपर्क साधला असल्याचे सांगितले जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडी(यू)ने १५ जागांवर आघाडी घेतल्याने सर्व राजकीय विश्लेषकांना आश्चर्यचकित केले आहे. पूर्वेकडील राज्याचे चित्र बघितल्यास भाजपाची परिस्थिती वाईट आहे. भाजपा पूर्वेकडील राज्यात केवळ १३ जागांवर आघाडीवर आहे. एका ज्येष्ठ जेडी(यू) नेत्याने ‘हिंदुस्तान टाईम्स’ला सांगितले की पक्ष आपल्या निष्ठेवर कायम राहील. या वर्षी एनडीएमध्ये परत येण्याआधी नितीश कुमार इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांपैकी एक होते.
हेही वाचा : Lok Sabha Election Results Live Updates : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला धक्का, इंडिया आघाडीला ४२ जागांवर आघाडी
काँग्रेसच्या सूत्रांनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील काँग्रेस आपल्या गोटात सामील करू शकतील अशी पक्षाला आशा आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना १० जागांवर आघाडीवर आहे. विशेषतः आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्रितपणे चांगली कामगिरी करण्याच्या विश्वासावर ते इंडिया आघाडीत सामील होतील, अशी अपेक्षा काँग्रेसला आहे. या विषयी पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलले आहेत. प्रचारात दोन्ही बाजूंनी कडाडून हल्ले झाले असले तरी, या निर्णयाचा आघाडीला सकारात्मक परिणाम होणार आहे. बाहेरून पाठिंबा मिळाल्यावर इंडिया आघाडी २७२ चा निम्मा टप्पा पार करू शकेल, अशी आशा काँग्रेसला आहे. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळण्याचे कोणतेही संकेत अद्याप मिळालेले नाहीत.