यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये एनडीएची मोठी पीछेहाट झाली असून इंडिया आघाडीनं जोरदार मुसंडी मारली आहे. समाजवादी पक्षानं भारतीय जनता पक्षाच्या जागा जिंकून भाजपाला मोठा धक्का दिला आहे. उत्तर प्रदेशातील एकूण जागांपैकी सर्वाधिक चर्चेतील दोन जागा म्हणजे अमेठी आणि रायबरेली. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसच्या उमेवारांनी बाजी मारली आहे. रायबरेलीत खुद्द राहुल गांधी निवडून आले असून अमेठीतून काँग्रेस नेते किशोरी लाल शर्मा यांनी भाजपाच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना आस्मान दाखवलं. या निकालानंतर किशोरी लाल शर्मा यांच्या मुलींनी स्मृती इराणींना खोचक शब्दांत सुनावलं आहे.

२०१९ च्या निवडणुकीत स्मृती इराणींचा विजय

याआधी गेल्या निवडणुकीत राहुल गांधी अमेठीतून निवडणुकीला उभे राहिले होते. मात्र, स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला. “काहीही झालं तरी अमेठीतून राहुल गांधींना जिंकू देणार नाही”, अशी भीष्मप्रतिज्ञा स्मृती इराणी यांनी केली होती. यावेळी राहुल गांधींनी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर करताच भाजपानं त्यांच्यावर पळ काढल्याची टीका केली होती. तसेच, खुद्द स्मृती इराणी यांनीही अमेठीतून राहुल गांधींनी त्यांच्या नोकराला निवडणुकीला उभं केल्याची टीका केली होती.

१ लाख ६७ हजार मतांनी इराणींचा पराभव

मंगळवारी ४ जानेवारी रोजी अमेठीतून धक्कादायक निकाल समोर आले. काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा यांनी तब्बल १ लाख ६७ हजार १९६ मतांनी स्मृती इराणी यांना धोबीपछाड दिली. किशोरी लाल शर्मा यांना ५ लाख ३९ हजार २२८ मतं मिळाली तर स्मृती इराणी यांना ३ लाख ७२ हजार ०३२ मतं मिळाली. बहुजन समाजवादी पक्षाचे नन्हेसिंह चौहान यांना ३४ हजार ५३४ मतं मिळाली.

“आता आकडेच तुम्हाला सगळं सांगत आहेत”

दरम्यान, किशोरी लाल शर्मा यांच्या विजयावर त्यांच्या मुलींनी खोचक शब्दांत स्मृती इराणींना टोला लगावला आहे. तसेच, त्यांच्या वडिलांवर स्मृती इराणींनी केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला आहे. “तुम्ही आमच्या वडिलांना नोकर बोला, शिपाई बोला, प्रॉक्सी उमेदवार बोला, मुंगी बोला, काहीही बोला.. आम्हाला काही फरक पडत नाही. जे काही आहे ते सगळं आकडेच तुम्हाला सांगत आहेत. तुम्ही निकाल पाहिला आहे”, असं त्यांच्या धाकटी लेक अंजली शर्मा हिनं म्हटलं आहे.

“मी स्मृती इराणींविरोधात निवडणूक लढलो नाही, तर…”; अमेठीतील विजयी काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया

तसेच, “स्मृती इराणी ज्यांच्याबाबत हे सगळं म्हणाल्या, त्यांच्याच विरोधात त्या निवडणूक लढवत होत्या. बाकी मी हेच सांगेन की त्यांनी बहुतेक प्रियांका गांधींची नक्कलही केली होती. ती खूप चांगली होती. त्या चांगल्या अभिनेत्री आहेत. पण मी त्यांना त्यांच्या करिअरसंदर्भात सल्ला देण्यालायक नाही. तो त्यांचा प्रश्न आहे”, असंही तिने म्हटलं आहे. या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

“अमेठी नेहमीपासूनच आमचं कुटुंब राहिलं आहे. जेव्हापासून मी रायबरेली म्हणूही शकत नव्हते, लायब्ररी म्हणत मी घरभर फिरायचे तेव्हापासून आमच्या घरात अमेठी आणि रायबरेलीबद्दल चर्चा होत आहेत. आम्हा दोघींच्या नावांपेक्षा घरात अमेठी-रायबरेलीची नावं जास्त ऐकायला मिळतात”, असं अंजली यावेळी म्हणाली.

किशोरी लाल शर्मा विजयानंतर काय म्हणाले?

दरम्यान, किशोरी लाल यांनी आपल्या विजयाबद्दल प्रतिक्रिया देताना अमेठी आणि गांधी कुटुंबाचा उल्लेख केला. “हा विजय अमेठीच्या लोकांचा आणि गांधी कुटुंबाचा आहे. अमेठी मतदारसंघ हा गांधी कुटुंबाची माझ्यावर टाकलेली जबाबदारी आहे. त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही”, असं किशोरी लाल शर्मा पीटीआयला म्हणाले.

Live Updates
Story img Loader