१४ फेब्रुवारी रोजी उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात मतदान पार पडलं. एकीकडे सत्ताधारी भाजपा सत्ता राखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असताना दुसरीकडे काँग्रेसनं मात्र राज्यात सत्तापालट होण्याचा दावा केला आहे. यातच एक व्हिडीओ काँग्रेसचे सरचिटणीस हरीश रावत यांनी शेअर केला असून त्यावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना हरीश रावत यांनी मतदान प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. तसेच, निवडणूक आयोग या प्रकाराची दखल घेईल का? असा देखील सवाल त्यांनी या व्हिडीओसोबत उपस्थित केला आहे.
हरीश रावत यांनी यासंदर्भात एक ट्वीट करून गंभीर आरोप केला आहे. “सगळ्यांच्या माहितीसाठी एक व्हिडीओ व्हायरल करतो आहे. यामध्ये एका आर्मी सेंटरमध्ये कशा प्रकारे एकच व्यक्ती सर्व मतपत्रिकांवर टिक करत आहे हे दिसतंय. एवढंच नाही, तर सगळ्या मतपत्रिकांवर सह्या देखील तीच व्यक्ती करत असल्याचं दिसत आहे. त्याचा एक नमुना बघा. निवडणूक आयोग या प्रकाराची दखल घेईल का?” असा सवाल हरीश रावत यांनी केला आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
हरीश रावत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी दावा केल्याप्रमाणे एक व्यक्ती मतपत्रिकांवर सह्या करत असून उमेदवारांच्या नावापुढे टिक देखील करत आहे. या व्यक्तीच्या हातात अनेक मतपत्रिका दिसत असून त्याच्यासोबत इतरही काही व्यक्तींचं संभाषण ऐकू येताना दिसत आहे. हा व्हिडिओ नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यानचा असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. मात्र, नेमका हा व्हिडीओ कुठून आला यासंदर्भात खुलासा करण्यात आलेला नाही.
दरम्यान, भाजपाकडून हरीश रावत यांचे हे आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. “लोकांना भरकटवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न फसला आहे. त्यामुळेच काँग्रेसकडून अशा गोष्टी करण्यात येत आहेत. पराभवाच्या भीतीमुळेच आधी ते इव्हीएम घोटाळ्याविषयी बोलत होते, आता बॅलट पेपर घोटाळ्याविषयी बोलत आहेत”, अशी प्रतिक्रिया भाजपाचे उत्तराखंड माध्यम समन्वयक मानवीर सिंग यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे.
१४ फेब्रुवारी रोजी उत्तराखंडमध्ये मतदान झालं असून १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.