देशभरातील ५४२ जागांसाठी लोकसभा निवडणुकांची मतमोजणी चालू आहे. काही जागांवरील मतमोजणी पूर्ण झाली असून विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे, तर काही ठिकाणी अद्याप मतमोजणी चालूच आहे. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री व भाजपाच्या दिग्गज नेत्या स्मृती इराणींना मोठा धक्का बसला आहे. स्मृती इराणी या मतमोजणी सुरू झाल्यापासूनच उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघात पिछाडीवर होत्या.
अमेठीत काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल शर्मा सकाळी मतमोजणी सुरू झाल्यापासून आघाडीवर होते. एकाही फेरीत स्मृती इराणींना शर्मांना मागे टाकता आलं नाही. दोघांच्या मतांमध्ये जवळपास २० हजारांचे अंतर कायम होते. अखेर या मतदारसंघातून शर्मा विजयी झाले आहे. शर्मा यांनी मोजणी सुरू असताना या निकालावर प्रतिक्रिया दिली असून हा त्यांचा नाही तर गांधी कुटुंबाचा विजय असल्याचं म्हटलं आहे.
“दुर्दैवाने मोदींच्या हुकुमशाही मानसिकतेमुळे…”, सुब्रह्मण्यम स्वामींची सूचक पोस्ट
“अमेठीतील विजय हा गांधी कुटुंबाचा व इथल्या जनतेचा विजय आहे. मतमोजणी चालू आहे, पण मी विजयी झाल्यानंतर हा विजय त्यांनाच समर्पित असेल. मी स्मृती इराणींविरोधात निवडणूक लढलो नाही, तर इथली जनता लढली आहे. मी इथे फक्त एक उमेदवार म्हणून फिरत राहिलो, पण खरं काम इथल्या जनतेने केलं आहे. माझ्यासाठी प्रियांका गांधी, राहुल गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांनी खूप केलं आहे. प्रियांका गांधी तर इथे अडीच दिवस राहिल्या. हा विजय त्यांच्यामुळे मिळाला आहे. मला तिकिट दिलं ते गांधी कुटुंबाने, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी त्यांचा विश्वास सार्थ ठरवला,” असं किशोरी लाल शर्मा ‘एएनआय’ शी बोलताना म्हणाले. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर काही वेळातच ते विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.
शर्मा मूळचे लुधियानाचे आहे. ते खूप वर्षांपासून गांधी घराण्याच्या जवळचे मानले जातात. अमेठी आणि रायबरेलीमध्ये ते निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. १९८३ पासून ते रायबरेली आणि अमेठीमध्ये सक्रिय आहेत. दोनदा अमेठी मतदारसंघातून विजयी होणाऱ्या स्मृती इराणी यांना शर्मांनी तगडी टक्कर देत अमेठीत आघाडी टिकवून ठेवली आणि विजयही मिळवला. या ठिकाणी निवडणूक लढवून दोनदा संसदेत जाणाऱ्या स्मृती इराणींची हॅट्रिक शर्मा यांनी रोखली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd