मुरली देवरा, बाबा सिद्दीकी, अशोक चव्हाण यांच्यासारख्या दिग्गजांनी काँग्रेसचा हात सोडून वेगळी वाट धरली. मुरली देवरा शिवसेनेत, बाबा सिद्दीकी राष्ट्रवादीत तर अशोक चव्हाण भाजपात गेले. महायुतीतलं हे इनकमिंग थांबलेलं नसतानाच आता काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त शिवसेनेच्या वाटेवर आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यांनी जर एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती भगवा झेंडा घेतला तर काँग्रेससाठी तो आणखी एक धक्का असणार आहे.
प्रिया दत्त शिवसेनेच्या वाटेवर?
काँग्रेसचे दिवंगत खासदार आणि अभिनेते सुनील दत्त यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांची मुलगी प्रिया दत्तला लोकसभा निवडणुकीचे तिकिट देऊन खासदार केलं होतं. मात्र आता याच प्रिया दत्त काँग्रेस सोडून शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. असं घडल्यास महायुतीचं बळ वाढणार आहे.
प्रिया दत्त २००९ मध्ये झाल्या होत्या खासदार
प्रिया दत्त या २००९ च्या निवडणुकीत उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. मात्र, त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपाच्या पूनम महाजन यांनी हरवलं होतं. एकेकाळी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावर प्रिया दत्त यांची घट्ट पकड होती. परंतु, २०१४ मधल्या मोदी लाटेनंतर काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागल्याने सक्षम उमेदवार असूनही प्रिया दत्त यांचा पूनम महाजन यांच्यासमोर टिकाव लागला नव्हता.
सध्याच्या घडीला प्रिया दत्त या काँग्रेस पक्षात फारशा सक्रिय नाहीत. एका एनजीओच्या माध्यमातून त्या समाजसेवा करतात. समाजकारण करणं हा देखील राजकारणाचाच भाग आहे असं प्रिया दत्त मानतात. त्यांनी काँग्रेस सोडण्यावर आणि शिवसेनेत जाण्याच्या चर्चांवर अद्याप काहीही भाष्य केलेलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिया दत्त लवकरच शिंदे गटात प्रवेश करु शकतात. एवढेच नव्हे तर त्यांना शिंदे गटाकडून उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. गेल्या पाच वर्षांपासून प्रिया दत्त या मतदारसंघात फारशा सक्रिय नाहीत. आता नेमकं काय होणार ते सध्या तरी स्पष्ट नाही. मात्र या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.