पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मंगळसूत्राच्या टीकेवरुन काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी चांगल्याच आक्रमक झालेल्या पाहण्यास मिळाल्या. त्यांनी त्यांची आई सोनिया गांधी आणि आजी इंदिरा गांधी यांचं उदाहरण देत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नरेंद्र मोदींनी राजस्थानच्या सभेत जे वक्तव्य केलं त्यावरुन विविध प्रतिक्रिया येत आहेत. आता प्रियांका गांधींनीही मोदींवर टीका केली आहे.
काय म्हणाल्या प्रियांका गांधी?
“पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की काँग्रेस पक्ष विभाजन धार्जिणा आहे. साठ वर्षांत फक्त त्यांनी त्यांची तिजोरी भरली बाकी काही केलं नाही. मात्र मी त्यांना सांगू इच्छिते माझ्या आईचं मंगळसूत्र (राजीव गांधी) देशासाठी शहीद झालं. काँग्रेस पक्ष तुमच्या गळ्यात मंगळसूत्र ठेवणार नाही असं मोदी म्हणतात. ७० वर्षांपासून देश स्वतंत्र आहे. त्यातल्या ५५ ते साठ वर्षांमध्ये काँग्रेसची सत्ता होती. कधी कुठल्या स्त्रीचं मंगळसूत्र हिसकावून घेतल्याचं उदाहरण आहे का?” असा सवाल प्रियांका गांधींनी केला.
माझ्या आईचं मंगळसूत्र देशासाठी शहीद झालं-प्रियांका गांधी
प्रियांका गांधी पुढे म्हणाल्या, “इंदिरा गांधींनी युद्ध झालं तेव्हा त्यांचं सोनं या देशाला दिलं. माझ्या आईचं मंगळसूत्र (राजीव गांधी) या देशासाठी शहीद झालं आहे. वास्तव हे आहे की महिलांचा संघर्ष काय? हे यांना ठाऊक नाही. महिलांचा सेवाभाव हा देशाचा आधार आहे.” असंही प्रियांका गांधी म्हणाल्या.
मोदींना मंगळसूत्राचं महत्त्व कळलं असतं तर ते कधीही अशा अनैतिक गोष्टी बोलले नसते. शेतकऱ्याला कर्ज झालं की त्याची पत्नी दागिने गहाण ठेवते. घरात लग्नकार्य असेल तर महिला त्यांचं सोनं गहाण ठेवतात. मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेतल्याने अनेक महिलांची बचत संपली तेव्हा मोदी कुठे होते? लॉकडाऊनमध्ये मजूर पायी चालले, त्यावेळी महिलांनी दागिने गहाण ठेवले होते तेव्हा मोदी कुठे होते? शेतकरी आंदोलनात शेकडो शेतकरी शहीद झाले, त्या विधवांच्या मंगळसूत्राचा विचार मोदींनी केला का? मणिपूरमध्ये एका लष्करी जवानाच्या पत्नीची विवस्त्र धिंड काढण्यात आली त्यावेळी मोदींनी तिच्या मंगळसूत्राचा विचार केला का? असे प्रश्नही प्रियांका गांधींनी विचारले आहेत.
महिलांना घाबवरलं जातं आहे
बंगळुरुतल्या सभेत बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या, महिलांना घाबरवलं जातं आहे. मंगळसूत्राचा आरोप करुन त्यांना मतदान केल्याचं आवाहन केलं जातं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या देशातल्या नेत्याने नैतिकता सोडून दिली आहे. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात डांबलं आहे. विरोधकांना कमकुवत करण्यासाठीच हे केलं जातं आहे. मागच्या दहा वर्षांत या सरकारने काहीही काम केलेलं नाही. मणिपूरच्या भगिनींचे अश्रू पुसण्यासाठी मोदी का गेले नाहीत? असाही सवाल प्रियांका गांधींनी केला आहे.
राजस्थानच्या सभेत मोदी काय म्हणाले होते?
“काँग्रेसने ज्या योजना आणल्या त्यातून त्यांची धोरणं जास्त मुलं जन्माला घालणाऱ्यांना सगळी मदत करणं आहे. जे घुसखोर आहेत त्यांना काँग्रेसची मदत होते आहे. मी माता भगिनींना सांगू इच्छितो की यांचा अर्बन नक्षलवादाचा विचार हा तुमच्या गळ्यात तुमचं मंगळसूत्रही ठेवणार नाही.” असं मोदी म्हणाले होते. त्यावरुन जो वाद निर्माण झाला त्यानंतर आता प्रियांका गांधींनी सोनिया गांधींचं उदाहरण देत मोदींवर टीका केली आहे.