काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केरळच्या वायनाड आणि उत्तर प्रदेशच्या अमेठीमधून निवडणूक लढवली होती. २०१९ च्या निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला होता. यानंतर आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना वायनाडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. असे असले तरी काँग्रेसकडून अद्याप उत्तर प्रदेशच्या अमेठी मतदारसंघामधून कोण निवडणूक लढवणार, याबाबत संभ्रम आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यातच खासदार राहुल गांधी यांनी अमेठीबाबतचा सस्पेन्स आणखी वाढवला आहे. आज (१७ एप्रिल) झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी याबाबत भाष्य केले. ते म्हणाले, “काँग्रेस पक्षाचे हायकमांड जो निर्णय घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असेल.” दरम्यान, गांधी घराण्यातील काँग्रेस नेत्यांनी अमेठी मतदारसंघातून अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. राहुल गांधी यांनी २००४, २००९, २०१४ साली अमेठीमधूनच निवडणूक जिंकली होती.

हेही : आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रांना पदावरुन हटवा; काँग्रेसने का घेतली आक्रमक भूमिका?

इंडिया आघाडीमध्ये रायबरेली आणि अमेठी असे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. मात्र, या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघात काँग्रेसचा मोठा प्रभाव असल्याचे मानले जाते. पण २०१९ च्या निवडणुकीत अमेठीमधून राहुल गांधींना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे अमेठीत काँग्रेसचे वर्चस्व कमी झाल्याचे बोलले जाते.

काही दिवसांपूर्वी अमेठी मतदारसंघामधून प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी निवडणूक लढवण्यासंदर्भात सूचक भाष्य केले होते. तेव्हापासून त्यांचे नाव चर्चेत आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या रायबरेलीमधून निवडणूक लढवणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप पक्षाकडून अधिकृत निर्णय झालेला नाही. त्यामुळे अमेठी आणि रायबरेलीमधून कोण निवडणूक लढवणार? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader rahul gandhi on amethi lok sabha election 2024 marathi news gkt