काँग्रेस नेते शशी थरूर यांनी गुरुवारी गोव्यात प्रचार करत असताना मतदारांना भाजपाविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले. भाजपाच्या राज्यात आयडीया ऑफ इंडिया या कल्पनेला तडा गेला आहे, असेही शशी थरूर म्हणाले. दक्षिण गोव्यातील वर्ना येथे घेतलेल्या बैठकीत शशी थरूर म्हणाले, “आपली लोकशाही धोक्यात आहे. तुम्ही जेव्हा ७ मे रोजी मतदान कराल, तेव्हा तुम्ही स्वतःला एक प्रश्न जरूर विचारा. तुम्हाला कशाप्रकारचा भारत हवा आहे? तुमची मुले कोणत्या भारतात मोठी व्हावीत, असे तुम्हाला वाटते? भयग्रस्त भारत तुम्हाला हवा आहे का? जिथे फोनवर बोलतानाही तुम्हाला भीती वाटेल. कारण सरकार तुमचं बोलणं चोरून ऐकतंय अशी भीती तुमच्या मनात असेल. जिथे परिणामांच्या भीतीनं लोक मतं व्यक्त करण्यास धजावणार नाहीत.”

याऐवजी तुम्हाला मुक्तपणे व्यक्त होता येईल, जिथे तुम्हाला आवडेल ते खाता येईल, आवडते कपडे परिधान करता येतील, कुणावरही प्रेम करण्याची जिथे मोकळीक असेल, असा भारत तुम्हाला हवा आहे का? असाही प्रश्न शशी थरूर यांनी उपस्थित केला. जर हे नको असेल तर तुमच्या बेडरूम, किचन आणि तुमच्या तिजोरीपर्यंत येणारे सरकार तुम्हाला चालणार आहे का? कारण सध्या भारतातील सरकार याच पद्धतीचे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

आज भाजपाकडून ‘अब की बार ४०० पार’, अशी घोषणा दिली जात आहे. ही घोषण देण्यामागचे कारण काय? तुम्हाला ४०० हून अधिक जागा कशासाठी हव्या आहेत. फक्त संविधानात बदल करण्यासाठीच एवढ्या जागांची आवश्यकता आहे, असे म्हटले जात आहे. प्रत्येकाला समानतेचा अधिकार देण्याऐवजी भाजपा सारखा पक्ष “हिंदी, हिंदुत्व, हिंदुस्तान” अशा चाकोरीबद्ध संकल्पनेला घेऊन वाटचाल करत आहे. त्यांना एक देश, एक निवडणूक, एक पक्ष, एक नेता, एक धर्म आणि एकच देव हवा आहे. तसेच या सर्वांवर राज्य करण्यासाठी एकच शासक असावा”, अशी भाजपाची इच्छा असल्याचे सांगून शशी थरूर यांनी भाजपवार टीकास्र सोडले.

गोव्यामध्ये ७ मे रोजी मतदान पार पडणार आहे. गोव्यात उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. काँग्रेस नेते शशी थरूर हे दक्षिण गोव्यातील काँग्रेसचे उमेदवार विरिएटो फर्नांडिस यांच्या प्रचारासाठी आले असताना त्यांनी भाजपावर टीका केली. फर्नांडिस यांच्या विरोधात भाजपाच्या पल्लवी डेम्पो निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर उत्तर गोव्यात काँग्रेसकडून रमाकांत खलप आणि भाजपाकडून श्रीपाद नाईक निवडणुकीसाठी उभे आहेत.

Story img Loader