सांगली आणि भिवंडी या दोन मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये धुसफुस सुरू आहे. मविआच्या सर्व प्रमुख नेत्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन अंतिम जागावाटप जाहीर केले. तरीही सांगलीमधील नेत्यांना हा निर्णय रुचला नसल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे आमदार आणि सांगली जिल्ह्याचे नेते विश्वजीत कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. जागावाटपात सांगली मतदारसंघावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दावा दाखल केला असला तरी काँग्रेसने आणि मविआने पुन्हा एकदा या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी विश्वजीत कदम यांनी केली आहे.
विश्वजीत कदम म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीन पक्ष निवडणूक लढवत आहेत. जागावाटपाबाबत तीनही पक्षांची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. ही चर्चा सुरू असताना सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी हा मतदारसंघ आपल्याकडे राहावा, यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत होतो. सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. राष्ट्रीय नेत्यांपासून ते राज्यातील नेत्यांना आम्ही या मतदारसंघाबाबत विनंती केली होती. सांगलीतून लढण्यास आम्ही सक्षम आहोत, असेही सांगितले होते.
सांगलीच्या निर्णयाने कार्यकर्ते अस्वस्थ; निवडणुकीवर बहिष्कार अथवा बंडखोरीची मागणी
“सांगली जिल्ह्यात मविआचे अनेक आमदार आहेत. तसेच जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज संस्थेमध्ये काँग्रेसच्या विचारांचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे सांगलीचा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळावा, अशी आमची मागणी होती. कोल्हापूर लोकसभेसाठी छत्रपती शाहू महाराज यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे शिवसेनेचा हा मतदारसंघ काँग्रेसला मिळाला. मात्र सांगलीच्या बाबतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एकतर्फी निर्णय घेऊन सांगलीतून त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली”, असा आरोप विश्वजीत कदम यांनी केला.
मविआची गुढीपाडव्याला पत्रकार परिषद झाली असून त्यांनी अंतिम जागावाटप जाहीर केले आहे. त्यानुसार आता चित्र स्पष्ट झाले आहेच. तरीही सांगलीच्याबाबतीत महाविकास आघाडीने आणि काँग्रेसने पुन्हा एकदा फेरविचार करावा, अशी मागणी विश्वजीत कदम यांनी लावून धरली. तसेच पुढील काही दिवस कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचे काम विशाल पाटील आणि मी करेन असेही विश्वजीत कदम यांनी सांगितले.