Congress Lost in Haryana : हरियाणात काँग्रेस हरली, पण जागा वाढल्या; विधानसभेत विरोधी पक्षाचे भाजपासमोर तगडे आव्हान!

Haryana Vidhan Sabha Election Result 2024 Updates : दोन टर्म सत्ता असताना दशकभरात भाजपाने शहरी भागात आपला मतदारवर्ग तयार केला. गुरुग्राम आणि फरीदाबादमध्ये भाजपाला याचा फायदा झाला. काँग्रेसला ग्रामीण भागातून चांगले समर्थन मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात तितके मतदान झाले नाही.

Bhupindersingh hodda
काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत, त्यामुळे विरोधी पक्ष अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे (Photo : भूपिंदरसिंग हुड्डा/X)

Haryana Assembly Election 2024 Vote Counting Updates : हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपाच्या अटीतटीच्या लढतीत भाजपाने बाजी मारली आहे. तर, काँग्रेसचा फार कमी फरकाने पराभव झाला आहे. तसंच, भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरीही २०१९ च्या तुलनेत काँग्रेसच्याही जागा वाढल्या आहेत. त्यामुळे यंदा विरोधक अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

२०१९ मध्ये भाजपाला ४० जागा मिळाल्या होत्या. जननायक जनता पक्षाच्या सहकार्याने त्यांनी बहुमत स्पष्ट केलं अन् सरकार स्थापन केलं होतं. तर, काँग्रेसला ३१ जागा मिळाल्या होत्या. यंदा, भाजपाला ४८ जागा मिळाल्या असून बहुमताचा आकडा गाठला आहे. तर, काँग्रेसला ३६ जागा मिळाल्या आहेत. म्हणजे, काँग्रेसच्या ५ जागा वाढल्या तर, भाजपाच्या ८ जागा वाढल्या आहेत.

दोन टर्म सत्ता असताना दशकभरात भाजपाने शहरी भागात आपला मतदारवर्ग तयार केला. गुरुग्राम आणि फरीदाबादमध्ये भाजपाला याचा फायदा झाला. काँग्रेसला ग्रामीण भागातून चांगले समर्थन मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात तितके मतदान झाले नाही. दरम्यान, काँग्रेसचा विजय झालेला नसला तरीही काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ वाढले आहे. त्यामुळे गेल्या टर्मच्या तुलनेत यंदा विधानसभेत अधिक खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

हेही वाचा >> Haryana Assembly Election 2024 Result: हरियाणामध्ये काँग्रेसचं काय चुकलं? ही आहेत पराभवाची ५ कारणं

भाजपाने पडद्यामागे राहून जमिनीवर आपले काम चालू ठेवले होते. सरकारी योजना लोकांपर्यंत नेल्या. त्याचा त्यांना लाभ मिळाला. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना निवडणूक रणनीतीची जबाबदारी देण्यात आली होती. सध्याचे निकाल पाहता त्यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडल्याचे दिसत आहे. भाजपाने यावेळी तिसऱ्यांदा सत्ता खेचून आणली आहे.

काँग्रेसच्या पराभवाचं नेमकं कारण काय?

काँग्रेसने हुड्डा यांच्या नेतृत्वाखाली जाट समुदायाच्या मतांवर डोळा ठेवला होता. तर भाजपाने जाट वगळता इतर समाजांना एकत्र केले. निवडणूक प्रचारात भाजपाच्या काही नेत्यांनी जाटशाही या शब्दाचा उल्लेख केला होता, अशी बातमी एनडीटीव्हीने दिली आहे. काँग्रेसचा विजय झाला असता तर जाट समाजाचे पुन्हा राज्यावर वर्चस्व राहिले असते, असा एक संदेश यातून गेला. त्यामुळेच इतर समाजाचे भाजपाच्या पारड्यात मतदान गेले, असा अंदाज व्यक्त होत आहे.

एक्झिट पोलचे अंदाज ठरले खोटे

एग्झिट पोल्सचे अंदाज आणि राज्यात सत्ताधाऱ्यांविरोधातील रोष पाहून यावेळी हरियाणात काँग्रेस पक्ष सत्तेत येणार, असा अंदाज काँग्रेसचे नेते व्यक्त करत होते. एग्झिट पोल्सनुसारही काँग्रेसच सत्तेवर येईल, असं मानलं जात होतं. त्यामुळे काँग्रेस नेते अतिआत्मविश्वासात होते. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी तर भाजपाच्या २० पेक्षा जास्त जागा आल्या तर नाव बदलेन असं आव्हान दिलं होतं. परंतु, हे अंदाज आता खोटे ठरले आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress lost in haryana but seats increased in the legislative assembly the opposition party has a strong challenge in front of the bjp sgk

First published on: 08-10-2024 at 20:03 IST
Show comments