मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. भाजपा आणि काँग्रेसकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. आता काँग्रेसकडून १०६ पानांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये शेतकरी महिला, कर्मचारी आणि सर्व समाजांना लक्ष्य केंद्रीत केलं आहे. तसेच, काँग्रेस सत्तेत आल्यास मध्य प्रदेशच्या संघाचा आयपीएलमध्ये समावेश केला जाईल, असं आश्वासन काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिलं आहे.
जाहीरनामा प्रसिद्ध करताना कमलनाथ म्हणाले, “राज्यातील सर्व नागरिकांना २५ लाखापर्यंत आरोग्य विमा संरक्षण देऊ. त्यात १० लाख रूपयांच्या अपघाती विम्याचाही समावेश असेल. शेतकऱ्यांचं २ लाखापर्यंतचे कर्ज माफ केले जाईल. तसेच, महिलांना महिन्याला १५०० हजार रूपये देण्यात येतील.”
“मध्य प्रदेशच्या संघाचा आयपीएलमध्ये समावेश करू. घरगुती गॅस ५०० रूपयांना मिळेलं. शालेय शिक्षण मोफत करण्यात येईल. जुनी पेन्शन योजना लागू करू. बेरोजगार तरूणांना दोन वर्षांसाठी १५०० ते ३००० हजार रूपये भत्ता देऊ,” असेही कमलनाथ यांनी सांगितलं.
हेही वाचा : काँग्रेसच्या पहिल्या यादीत तीनही राज्यांतील कप्तान रिंगणात
काँग्रेसच्या जाहीरनाम्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची प्रतिक्रिया आली आहे. “काँग्रेसचा हा जाहीरनामा खोटा आहे. पाच वर्षापूर्वी काँग्रेसनं ९०० हून अधिक आश्वासनं दिली होती. पण, त्यातील एकही पूर्ण केलं नाही. पुन्हा एकदा खोटी आश्वासनं देण्यात आली आहेत. यावर नागरिक विश्वास ठेवणार नाहीत. नागरिकांना माहितीय, भाजपा जे बोलते, ते करून दाखवते,” असं शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसला लक्ष्य करत सांगितलं.