Ravindra Dhangekar Vs Devendra Fadnavis: राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या मतदारसंघाच्या निकालांकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे, त्यामध्ये भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातील कसबा मतदारसंघाचाही समावेश आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी कसब्यातून विजय मिळवत भाजपाच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला होता. आता पुन्हा एकदा या मतदरसंघात धंगेकरांनी शड्डू ठोकला असून, त्यांच्यासमोर यावेळीही भाजपाच्या हेमंत रासने यांचे आव्हान आहे.
दरम्यान हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांनी कसबा मतदारसंघात सभा घेतली होती. या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका करताना, धंगेकर ‘ॲक्सिडेंटल आमदार’ असल्याचे म्हटले होते. आता धंगेकरांनी पोर्शे अपघात प्रकरणाचा उल्लेख करत फडणवीस यांच्या या टीकेला उत्तर दिले आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
कसबा मतदारसंघात भाजपाच्या हेमंत रासने यांच्यासाठी आयोजीत केलेल्या प्रचारसभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपल्याला माहित आहे काही दिवसांपूर्वी ‘ॲक्सिडेंटल पीएम’ चित्रपट आला होता. तसाच या कसब्यातही मागच्या निवडणुकीत एक ‘ॲक्सिडेंटल आमदार’ तयार झाला. हा आमदार काम कमी आणि दंगे आणि नाटकंच जास्त करतो. मला वाटते या आमदाराला जर रंगभूमीवर नेले असते तर त्याने ‘तो मी नव्हेच’ हे पात्र छान केले असते.”
रवींद्र धंगेकरांचे प्रत्युत्तर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभेत केलेल्या टीकेला आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, “खरे तर पुणे आणि पेठा या जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवलेले शहर आहे. त्यामुळे इथे वर्षानुवर्षे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र काम करत आले आहेत. या शहराच्या जडण-घडणीत सर्वांचाच सिंहाचा वाटा आहे. अशी परिस्थिती असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धार्मिक सलोख्याला नख लावायचे काम केले.”
आमदार धंगेकर पुढे म्हणाले, “ज्यावेळी निवडणूक हरत असल्याचे त्यांच्या किंवा पक्षाच्या लक्षात त्यावेळी ते जाती-पातीवर भाषण करतात. ते म्हणाले की, धंगेकर एकपात्री नाटक आहे. मी त्यांचे आभार मानतो, त्यांनी माझी सर्व नाटकं बघितली आहेत. जीन नाटकं त्यांनी बघितली आहे, त्यामध्ये पोर्शे कार अपघातही बघितला आहे. यामध्ये दोन मुलं मृत्यूमुखी पडली आणि यामध्ये पोलीस, गृहखाते आणि त्यांच्या मित्रपक्षांनी हे प्रकरण चुकीच्या मार्गाने कसे नेले हे पुणेकरांनी पाहिले आहे. पण त्याच प्रकरणात मी लक्ष घातल्यानंतर एका केसचा दोनदा पंचनामा होतो हे आपण बघितले आहे आणि दुसऱ्या पंचनाम्यात त्या लोकांना शिक्षा झाल्याचेही आपण बघितले आहे. “