गेल्या दोन दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक विधान सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळापर्यंत सगळीकडे व्हायरल होत आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींनी आपल्याला देवानं पृथ्वीवर पाठवलं असल्याचं विधान केलं होतं. त्यावरून विरोधकांनी भारतीय जनता पक्ष व खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बरंच तोंडसुख घेतल्यानंतर आता काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी मोदींच्या त्या विधानावर खोचक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाला टॅग करून “एक निष्पाप प्रश्न” म्हणत सवाल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे विधान दोन आठवड्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमधलं असल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या मुलाखतीमध्ये महिला पत्रकाराने “तुम्ही एवढं काम करता तर थकत का नाहीत?” असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना मोदींनी आपला जन्म जैविक प्रक्रियेतून झाला नसल्याचं विधान केलं. “मी आता या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, माझा जन्म जैविकदृष्ट्या झालेला नाही. मला ईश्वराने त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी पाठविले आहे”, असं मोदी म्हणाले.

“माझी आई जिवंत होती तोपर्यंत मला वाटायचे की, माझा जन्म झाला असावा. पण आईच्या निधनानंतर मी सर्व अनुभवांना एकत्रित करून पाहतो, तेव्हा मी एका निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, परमात्म्यानंच मला पाठवलं आहे. माझ्यातील ऊर्जा ही मानवी शरीरातून मिळालेली नाही. ही ऊर्जा देवानेच मला दिली असून त्यामाध्यमातून त्याला काहीतरी काम करून घ्यायचे आहे. यासाठीच मला सामर्थ्यही प्रदान केले आहे. तसेच मला पुरुषार्थ गाजविण्याचे सामर्थ्य आणि प्रेरणा देवाकडूनच मिळत आहे. मी काही नाही तर देवाचे साधन आहे. देवाने माझ्या रुपातून काहीतरी काम करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळेच परिणामांची चिंता न करता मी काम करत जातो”, असं विधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.

Video : “माझा जन्म झालेला नाही, मला देवानेच पाठवले”, पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान चर्चेत

शशी थरूर यांची पोस्ट आणि खोचक सवाल!

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानाचं वृत्त शेअर करत शशी थरूर यांनी एक खोचक पोस्ट लिहिली आहे. “माझा एक निष्पाप प्रश्न.. एखादी दैवी व्यक्ती भारताची नागरिक होण्यासाठी पात्र आहे का? आणि जर ती पात्र नसेल, तर त्या व्यक्तीला निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा किंवा निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे का?” असं शशी थरूर यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तसेच, त्यांनी या पोस्टमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगालाही टॅग केलं आहे. “स्वयंघोषित दैवी शक्ती निवडणुकीत सहभागी होत असल्याबाबत विचारण्यात आलेल्या या प्रश्नाची निवडणूक आयोग दखल घेईल का?” असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress mp shashi tharoor innocent question on pm narendra modi sent by god statement pmw