Karnataka Assembly Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीला आता अवघे दोन दिवस उरले आहेत. मागचे काही दिवस राज्यात जोरदार प्रचार सुरू होता. भाजपाने निवडणुकीच्या आधीपासूनच हिंदुत्वादावर भर दिला होता. हिजाबबंदी, हलाल मांसावर बंदी, लव्ह जिहाद, मुस्लीम समाजाचे आरक्षण रद्द करणे अशा अनेक भूमिका भाजपाने घेतल्या. ज्यामुळे अल्पसंख्याक समाजात नाराजीचे वातावरण आहे. हिजाबबंदीविरोधात काँग्रेसच्या उत्तर गुलबर्गा मतदारसंघाच्या आमदार कनीझ फातिमा या ठामपणे उभ्या राहिल्या होत्या. हिजाब परिधान करून निवडणुकीचा प्रचार करणाऱ्या फातिमा या मतदारसंघातील मुस्लीम मतदारांना त्यांच्या हक्काचे रक्षणकर्त्या असल्याचे म्हणवतात. उत्तर गुलबर्गा मतदारसंघात ६० टक्के मुस्लीम मतदार आहेत. कनीझ फातिमा कोण आहेत? त्या राजकारणात येऊन भाजपाच्या विरोधात कशा उभ्या राहिल्या? याबद्दल घेतलेला हा आढावा.
‘द इंडियन एक्सप्रेस’ दैनिकाच्या प्रतिनिधींनी कनीझ फातिमा यांच्या प्रचाराचे निरीक्षण करून त्याचे वार्तांकन केले आहे. प्रचारसभेत बोलत असताना ६३ वर्षीय फातिमा म्हणाल्या, “कर्नाटकात काँग्रेसचा विजय होताच देशात एका नव्या बदलाचे वारे वाहायला सुरुवात होईल.” फातिमा या पूर्वीपासून राजकारणात नव्हत्या. त्यांचे पती, माजी मंत्री आणि सहा वेळा आमदार असलेले कमरुल इस्लाम यांचे २०१८ साली निधन झाले. पतीच्या निधनानंतर काही महिन्यांतच विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली आणि योगायोगाने फातिमा यांचा राजकारणात प्रवेश झाला. काँग्रेसने या वेळी उमेदवारी दिलेल्या त्या एकमात्र मुस्लीम महिला उमेदवार आहेत. जेडीएसनेदेखील उडीपी प्रांतातील कापू मतदारसंघात सबिना समद या एकमात्र मुस्लीम महिलेला उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने राज्यात एकही मुस्लीम उमेदवार दिलेला नाही.
कनीझ फातिमा या श्रद्धाळू मुस्लीम आहेत. २०२२ साली बोम्मई सरकारने जेव्हा महाविद्यालयात हिजाबबंदीचा निर्णय घेतला होता तेव्हा फातिमा यांनी गुलबर्गा येथे आंदोलन छेडले होते. तसेच २०२० मध्ये, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधातील आंदोलनातही त्या सहभागी झाल्या होत्या. “हिजाब परिधान करणे हा आमचा हक्क आहे. स्वतंत्र भारतात आम्हाला आमच्या चालीरीती पाळण्याचे स्वातंत्र्य आहे. आपण इतरांच्या वेशभूषेवर प्रश्न उपस्थित करू शकत नाही. या विषयावरून मुलींना महाविद्यालयात येण्यापासून रोखता येऊ शकत नाही,” अशी प्रतिक्रिया हिजाबबंदीच्या विरोधातील आंदोलना वेळी फातिमा यांनी दिली होती.
फातिमा यांना मतदारसंघात लिंगायत नेते आणि भाजपाचे युवा उमेदवार चंद्रकांत पाटील यांचे तगडे आव्हान आहे. चंद्रकांत पाटील यांचा २०१८ च्या निवडणुकीत फातिमा यांच्याकडून ५ हजार ९४० मतांनी पराभव झाला होता. तसेच त्या वेळी फातिमा यांच्याविरोधात नऊ मुस्लीम उमेदवार उभे होते. शिवाय जेडीएसच्या नासीर हुसैन उस्ताद यांचे आव्हानदेखील होतेच.
निवडणूक प्रचारादरम्यान फातिमा घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. मंडई, बाजार येथे जाऊन मुस्लीम मतदारांच्या मतांचे विभाजन होऊ देऊ नका, असे आवाहन त्या करत आहेत. आपल्यातल्या वादाचा इतरांना लाभ होऊ देऊ नका. मी सर्वांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत आहे. माझे पती कमरुल यांनी सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता, असे कळकळीचे आवाहन त्या मतदारांना करताना दिसल्या.
हे ही वाचा >> “मतदान करताना ‘अल्लाहू अकबर’ म्हणण्यास सांगितलं, तर…”, ‘जय बजरंगबली’ वादावर असदुद्दीन औवेसींची प्रतिक्रिया
उत्तर गुलबर्गा मतदारसंघात अनेक मुस्लीम उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत. पण भाजपानंतर सर्वात मोठे आव्हान आहे ते जेडीएसच्या उमेदवाराचे. फातिमा यांचे सहकारी अब्रार सैत म्हणाले की, मॅडम (फातिमा) महिला उमेदवार असल्यामुळे विरोधक चुकीचा प्रचार करत आहेत. अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न हाताळण्यासाठी त्या सक्षम नाहीत, असा प्रचार केला जात आहे. कमरुल इस्लाम यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने अनुभव नसलेल्या फातिमा यांना निवडणुकीचे तिकीट दिले. २०१८ साली फातिमा यांचा विजय झाला. त्यांच्या विरोधकांना पक्के ठाऊक आहे की, एकदा का त्यांचा पराभव झाला तर पुन्हा त्यांचे राजकारणात येणे कठीण आहे.
ॲड्. मोहम्मद जुनैदी यांनी २०१९ साली उत्तर गुलबर्गा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविली होती. त्यांनी फातिमा यांच्याबाबत माहिती देताना सांगितले की, दिवंगत नेते कमरुल इस्लाम यांच्याप्रमाणेच फातिमा यांनी हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा पुढे चालवली आहे. आम्ही रामनवमीला रामभक्तांना सरबत देतो, तसेच रमजानच्या महिन्यात रोझा ठेवणाऱ्यांनाही सरबत देतो. जर ते हिजाबला विरोध करत असतील तर आमच्याकडे हिजाब परिधान करणाऱ्या फातिमा यांच्यासारख्या नेत्या आहेत. ज्या दोन्ही समाजांमध्ये ऐक्य टिकवण्यासाठी प्रयत्न करतात.
यासोबतच फातिमा यांच्याबद्दल काही तक्रारीदेखील आहेत. करोना काळात २०२०-२१ मध्ये त्या सक्रिय नव्हत्या, असा एक त्यांच्यावर आरोप होतो. सैत मात्र फातिमा यांची बाजू घेताना सांगतात की, त्यांनी त्यांच्या पद्धतीने चांगले काम केले. आम्ही त्यांच्या वतीने जेवणाची पाकिटे वाटली. त्यांचे वय साठहून अधिक आहे, त्यामुळे करोनाच्या काळात त्यांनी स्वतःची काळजी घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे होते. फातिमा यांना पक्षाच्या वरिष्ठांचा चांगला पाठिंबा आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी कमरुल इस्लाम यांच्यासोबत काम केल्यामुळे फातिमा यांना पक्षाकडून नेहमीच चांगली साथ मिळते.
आणखी वाचा >> पैसे काय झाडाला लागतात का? कर्नाटकात तरी लागलेत… वाचा कसे ते?
शेख रोजा येथे प्रचार करत असताना काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाचे राज्यात सरकार आल्यास फातिमा या मंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार होऊ शकतात. कारण अल्पसंख्याक समाजातून त्या एकट्याच महिला आमदार असतील. भाजपाकडून मात्र फातिमा यांच्या अपयशाकडे बोट दाखवून मतदारसंघातील हिंदूबहुल परिसरातून एकगठ्ठा मते मिळविण्याचा प्रयत्न आहे.
फातिमा यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी शेख रोजा येथे प्रचार करत असताना मतदारांना सांगितले, “आमदारांनी तुमच्या परिसराकडे दुर्लक्ष केलेले आहे. मी २०१८ साली पराभूत होऊनदेखील मतदारसंघाच्या विकासासाठी एक कोटींचा निधी आणला होता. विचार करा, जर मी विजयी झालो तर किती निधी आणू शकतो. माझ्या फाऊंडेशनकडून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. मी निवडून येताच मतदारसंघातील झोपड्यांचा विकास करण्यासाठी निधी आणणार आहे. त्यामुळे तुम्ही इतरांच्या भूलथापांना बळी पडू नका.”
कर्नाटक निवडणुकीत १८७ महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. (एकूण उमेदवारांच्या केवळ सात टक्के) जेडीएसने १५ महिलांना उमेदवारी दिली आहे. भाजपा १२ आणि काँग्रेसने ११ महिलांना उमेदवारी दिली आहे, अशी माहिती असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्सने दिली. आम आदमी पक्षाने सर्वाधिक १७ महिलांना उमेदवारी दिली आहे. महिला उमेदवारांच्या एकूण संख्येत नऊ मुस्लीम उमेदवार आहेत. काँग्रेस आणि जेडीएसने एक-एक उमेदवार दिला असताना इतर सर्व अपक्ष उमेदवार आहेत.
अल्पसंख्याक उमेदवारांच्या बाबत बोलायचे झाल्यास काँग्रेसने एकूण ११ मुस्लीम उमेदवारांना तिकीट दिले आहे. तर जेडीएसने २३ मुस्लीम उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. ‘आप’नेदेखील १७ मुस्लीम उमेदवारांना तिकीट दिले आहे. कर्नाटकमध्ये मुस्लीम समुदायाची लोकसंख्या १२ टक्के एवढी आहे. यंदाच्या निवडणुकीत सात विद्यमान मुस्लीम आमदार निवडणूक लढवत आहेत, सातही आमदार काँग्रेस पक्षाचे आहेत.
उत्तर गुलबर्गा मतदारसंघात २००८ आणि २०१३ रोजी कमरुल इस्लाम यांचा विजय झाला होता. २००८ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गुलबर्गा या मतदारसंघाचे विभाजन होऊन हा मतदारसंघ तयार करण्यात आला होता. तसेच गुलबर्गा दक्षिण आणि ग्रामीण असे इतर दोन मतदारसंघही तयार करण्यात आले होते. तत्पूर्वी १९८९ पासून कमरुल इस्लाम हे गुलबर्गा मतदारसंघात २००४ चा अपवाद वगळता सलग विजय मिळवत आले होते. २००४ साली भाजपाच्या चंद्रशेखर पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता.