तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेत्या आणि खासदार महुआ मोईत्रा यांनी गुरुवारी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. त्यांचे नेते नेते भारताचे सम्राट नाहीत हे पक्षाने लक्षात घेतले पाहिजे. गोव्यातील या सर्वात जुन्या पक्षाने आपले काम नीट केले नाही. तसे केले असते तर भाजपाचा पराभव करण्यासाठी टीएमसीला या गोव्यात येण्याची गरज भासली नसती, अशा खोचक शब्दात मोईत्रा यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. भाजपाला पराभूत करणे ही काळाची गरज आहे आणि गोव्यात भाजपाचा पराभव करण्यासाठी टीएमसी युती करण्यास तयार आहे. मात्र त्यासाठी काँग्रेसला आपले वर्तन सोडावे लागेल, असे महुआ मोईत्रा म्हणाल्या.
गोव्यात काँग्रेस आणि भाजपामध्ये मुख्य लढाई आहे, या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या वक्तव्यावर टीएमसी नेते मोईत्रा यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांना येथे काही मते मिळाली तर ते बिगरभाजपा मतांचे विभाजन करतील.
आम्ही काँग्रेसकडे झोळी घेऊन उभे नाही, त्यांच्या खिशातल्या जागा मागितलेल्या नाहीत – संजय राऊत
पी. चिदंबरम यांच्या या विधानावर प्रत्युत्तर देताना महुआ मोइत्रा म्हणाल्या की, गोव्यात भाजपा आणि भाजपाविरोधी शक्तींचा सामना सुरू आहे. गोव्यात आज भाजपाविरोधी शक्ती काँग्रेस, आप आणि टीएमसी आहेत. या सर्वांमध्ये हा लढा आहे. यापैकी कोणीही असा दावा करू शकत नाही की तो एकटाच अस्तित्वात आहे.
गोव्यातील टीएमसीच्या प्रभारी महुआ मोईत्रा यांनी सांगितले की, तिन्ही पक्ष येथे लढत आहेत आणि हे खरे आहे. काँग्रेसनेही जागे झाले पाहिजे. टीएमसी येथे युतीसाठी तयार आहे. आम्ही म्हणतोय की, वाटाघाटीच्या टेबलावर या आणि आमच्याशी बोला, बघू कसे एकत्र भाजपचा पराभव करतो. ही काळाची गरज आहे, असे महुआ मोइत्रा यांनी सांगितले.
टीमसीला अहंकार नसल्याचा गोव्यातील जनता आदर करेल, असे मोईत्रा म्हणाल्या. सर्वजण एकत्र आले तर भाजपाचा पराभव करू शकतो, असे तृणमूल काँग्रेसचे म्हणणे आहे. चिदंबरम आणि काँग्रेस नेतृत्वाने हे समजून घेतले पाहिजे की भाजपाविरोधात लढण्याची हीच वेळ आहे. ही लढाई एकट्याने लढण्यास काँग्रेस सक्षम नाही हे समजून घेतले पाहिजे, असे महुआ मोईत्रा म्हणाल्या.