काँग्रेस हायकमांडने संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीचं पत्र जारी करण्यात आलं आहे. त्यात सहा वर्षांसाठी पक्षातून संजय निरुपम यांची हकालपट्टी केल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय निरुपम यांच्यावर कारवाई

पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत अखिल भारतीय काँग्रेस समितीने मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. सहा वर्षांसाठी ही कारवाई असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. तसेच प्रदेश काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांचे नावही काढून टाकण्यात आले आहे.

संजय निरुपम यांनी निर्णय घेण्यापूर्वीच कारवाई

दरम्यान, वायव्य मुंबई मतदारसंघ काँग्रेसला मिळण्याची शक्यता दुरावल्यामुळे निरुपम हे आज पक्षाचा राजीनामा देणार होते. त्यापूर्वीच काँग्रेसने कारवाई केली. कोणत्याच पक्षाने त्यांना उमेदवारीचे आश्वासन दिलेले नसल्याने ते कोठे जातात याची उत्सुकता आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका चॅनलवरच्या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. त्यामुळे संजय निरुपम भाजपात जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

संजय निरुपम यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी

वायव्य मुंबई मतदारसंघ हा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे असून, येथून उमेदवारी मिळावी, असा निरुपम यांचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र उमेदवारीबाबत आश्वासन दिले नव्हते. ‘निरुपम यांनी प्रवेश केल्यास त्यांचे स्वागतच आहे. त्यांना वायव्य मुंबईतून उमेदवारी देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेतील असे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले. निरुपम यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठीही प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पण उमेदवारीबाबत त्यांना कोणत्याच पक्षाने आश्वासन दिलेले नाही.

संजय निरुपम हे काँग्रेसच्या मुंबईतील आक्रमक नेत्यांपैकी एक नेते म्हणून ओळखले जातात. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. संजय निरुपम एकेकाळी शिवसेनेत होते. त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी बरेच वर्ष काँग्रेसमध्ये निष्ठेने काम केलं आहे. त्याची जाणीव काँग्रेस पक्षालाही होती. काँग्रेसच्या स्टार प्रचारक नेत्यांच्या यादीत ते होते. पण उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने अमोल किर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर संजय निरुपम यांनी खूप आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली होती. आता सहा वर्षांसाठी त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress party expel sanjay nirupam from party for six years scj