काँग्रेसने उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेलीच्या जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून रायबरेलीतून राहुल गांधी यांना तर अमेठीतून किरोशीलाल शर्मा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. राहुल गांधी आणि किशोरीलाल शर्मा हे दोघेही आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
अमेठी आणि रायबरेलीमध्ये २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. काँग्रेसने राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी पूर्ण केली असून यावेळी सोनिया गांधीदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा – आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा – खरगे यांचे पंतप्रधानांना दुसरे पत्र
अमेठी आणि रायबरेली हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जातो.या जागांवर पारंपारिकपणे गांधी कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवतात. मात्र, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर रायबरेलीची जागा खाली झाली आहे. तर २०१९ मध्ये स्मृती इराणी यांनी अमेठीतून राहुल गांधीचा पराभव केल्यानंतर ही जागाही काँग्रेसला गमवावी लागली आहे.
दरम्यान, भाजपाने अमेठी आणि रायबरेली या दोन्ही जाागांसाठी उमेदवारांची घोषणा केली असून अमेठीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना तर रायबरेलीतून दिनेश प्रताप सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. २०१९ मध्ये रायबरेलीतून सोनिया गांधी यांनी दिनेश प्रताप सिंह यांचा पराभव केला होता.