काँग्रेस पक्षाने त्यांच्या ट्विटरवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत चरणजीत सिंग चन्नी हेच पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील, अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. राज्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासाठी हे धक्कादायक असू शकते. कारण, त्यांनी स्वत:ला मुख्यमंत्री पदाची चेहरा म्हणून सादर करण्याचा आक्रमकपणे प्रयत्न केल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये? –
व्हिडिओमध्ये सोनू सूद म्हणतोय की, “खरा मुख्यमंत्री किंवा खरा राजा तोच, ज्याला बळजबरीने खुर्चीवर आणले जाते, त्याला संघर्ष करण्याची आणि ज्याला हे सांगण्याची गरज भासली नाही की मीच प्रमुखपदाचा उमेदवार आहे. तो असा असला पाहिजे की जो बॅकबेंचर होता आणि त्याता पाठीमागून उचलून खुर्चीवर बसवलं गेलं आणि सांगावं की तुम्ही योग्य आहात तुम्ही विराजमान व्हा. तो जो मुख्यमंत्री बनले, तो देश बदलू शकतो.”
चन्नी हे अनुसूचित जाती समुदायातून आलेले आहेत. ज्यांची लोकसंख्या राज्यात सुमारे ३२ टक्के आहे. चन्नी हे पंजाबमधील चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार राहिले आहेत. २००७, २०१२ आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. चन्नी यांनी २०१५ ते २०१६ या काळात पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले आहे.
पंजाबमध्ये आता २० फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापूर्वी १४ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार होती, परंतु गुरु रविदास जयंतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री चन्नी यांनी निवडणूक आयोगाकडे त्यात बदल करण्याची विनंती केली होती.