कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा विजय मिळाला असून भाजपाचा पराभव झाला आहे. कर्नाटकमध्ये सत्तेच्याच्या चाव्या पुन्हा एकदा भाजपाकडून काँग्रेसकडे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर देशभर यासंदर्भात प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षांकडून याच निकालाची देशभर पुनरावृत्ती होईल अशा प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमवीर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, प्रचारादरम्यान काँग्रेसने दिलेली पाच आश्वासनं पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतच पूर्ण केली जातील, असंही ते म्हणाले.
“कर्नाटकची जनता, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता, पदाधिकारी, नेते आणि कर्नाटकमध्ये काम केलेल्या काँग्रेसच्या देशातील इतर नेत्यांचं मी अभिनंदन करतो”, असं राहुल गांधी म्हणाले.
“अम्ही गरीबांच्या मुद्द्यांवर लढलो”
“कर्नाटकच्या निवडणुकीत एकीकडे भांडवलदारांची ताकद होती. दुसरीकडे गरीब जनतेची शक्ती होती. गरीबांच्या शक्तीने भांडवलदारांच्या ताकदीला हरवलं. हेच प्रत्येक राज्यात होईल. काँग्रेस पक्ष कर्नाटकात गरीबांबरोबर उभा राहिला. आम्ही गरिबांच्या मुद्द्यांवर लढलो”, असं राहुल गांधींनी यावेळी नमूद केलं.
“कर्नाटकच्या जनतेनं भाजपाला धडा शिकवला, आता…”, निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया!
“कर्नाटकच्या जनतेनं आम्हाला दाखवलंय की..”
“मला सगळ्यात जास्त ही गोष्ट आवडली की आम्ही द्वेषाने, चुकीच्या शब्दांनी ही लढाई नाही लढली. आम्ही प्रेमाने ही लढाई लढलो. कर्नाटकच्या जनतेनं आम्हाला हे दाखवलं की प्रेम या देशाला हवंसं वाटतंय. कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झालाय आणि प्रेमाची दुकानं उघडली गेली आहेत. हा कर्नाटकच्या जनतेचा विजय आहे”, असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
“आम्ही कर्नाटकत्या गरीब जनतेला पाच आश्वासनं दिली होती. आम्ही ही आश्वासनं पहिल्या दिवशी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण करू”, अशा शब्दांत राहुल गांधींनी जनतेला आश्वस्त केलं आहे.