MVA Seat Sharing for Maharashtra Assembly Election 2024: भारतीय जनता पक्षाकडून आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पण अद्याप महायुतीचं जागावाटप जाहीर झालेलं नसताना भाजपानं पहिली यादी आधीच जाहीर केल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. एकीकडे महायुतीमध्ये ही स्थिती असताना महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटप किंवा उमेदवार यादी हे काहीच जाहीर झालेलं नाही. त्यामुळे चर्चेला सुरुवात झाली असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी जागावाटपाबाबत मोठं विधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष भाजपानं ९९ उमेदवारांची यादी जाहीर केल्यामुळे आता शिवसेना (एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष यांच्यात उरलेल्या १८९ जागांचं वाटप केलं जाईल असं सांगितलं जात आहे. मात्र, त्याचवेळी भाजपाची ही पहिली यादी असून या १८९मध्ये भाजपाचे आणखी काही उमेदवारही असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकांची गणितं मांडली जात आहेत. त्यात आता महाविकास आघाडीकडूनही जागावाटप अंतिम झालं असून ते जाहीर करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे.

जागावाटपाबाबत काय म्हणाले नाना पटोले?

काँग्रेसच्या निवडणूक समितीची आज बैठक होणार असून त्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांना मविआच्या प्रलंबित जागावाटपाबाबत विचारणा केली असता त्यांनी उद्या म्हणजेच २२ ऑक्टोबर रोजी जागावाटप जाहीर केलं जाईल, असं सांगितलं. “महाविकास आघाडीचं ठरलं आहे. उद्या पहिली यादी येईल. आम्ही तिघे मिळून उद्या संध्याकाळी यादी जाहीर करू”, असं नाना पटोले यावेळी म्हणाले.

काँग्रेस-शिवसेना(उद्धव ठाकरे) वादाचं काय?

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले व संजय राऊत यांच्यात उमेदवारी व जागावाटपावरून वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. पण दोन्ही पक्षांमध्ये कोणत्याही जागेवरून कोणतेही वाद नसल्याचा दावा आता नाना पटोलेंनी केला आहे. “काँग्रेस व शिवसेनेत कोणतेही वाद नाहीत. कशाला उगाच आमच्यात भांडणं लावताय? आम्ही नसीम खान यांना शरद पवारांकडे पाठवलं होतं. आमची यादी त्यांच्याकडे होती. ते उद्धव ठाकरेंच्याही संपर्कात होते. आमची मुंबईतही चर्चा आहे. काल काही कारणास्तव आमची बैठक रद्द झाली. पण आज बैठक आहे. विदर्भातील १२ जागांबाबतही महाविकास आघाडीत वाद नाहीत. शिवसेना आमच्याच जागा मागते वगैरे कोणतीही चर्चा झालेली नाही. मेरिटवर उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाली”, असं नाना पटोलेंनी यावेळी स्पष्ट केलं.

BJP Candidates List : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी समोर; ९९ जागांसाठी जाहीर केले उमेदवार, कुणाला संधी?

भाजपाचे ९९ उमेदवार, १३ महिलांचा समावेश

दरम्यान, रविवारी भाजपानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यात १३ महिला उमेदवारांचा समावेश आहे. तसेच, या यादीमध्ये अनेक विद्यमान आमदारांना संधी देण्यात आल्याचं दिसून येत आहे. त्याशिवाय, नुकतेच काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले अशोक चव्हाण यांच्या मुलीलादेखील भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress screening committee meeting nana patole claims mva candidate list tomorrow pmw