हरियाणा विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसकडून आता ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून केला करण्यात आला आहे. यासंदर्भात काँग्रेसने काल निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. दरम्यान, आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. यावेळी तक्रार असलेल्या ईव्हीएम सीलबंद करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेते पवन खेरा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी बैठकीतील चर्चेबाबत माहिती दिली. “आज केसी वेणुगोपाल, जयराम रमेश, अजय माकन, अशोक गेहलोत, भूपेंद्र सिंह हुडा आम्ही सर्वांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी आम्ही आयोगाला २० तक्रारींबद्दल माहिती दिली आहे. मतमोजणीच्या दिवशी काही ईव्हीएम मशीनची बॅटरी ९९ टक्के होती. तर काही मशीन्सची बॅटरी ६० ते ७० टक्के होती. ज्यामशीनची बॅटरी ९९ टक्के होती. त्यात काँग्रेस पक्षाचे उमेदवार आघाडीवर होते. मात्र, कमी बॅटरी असलेले ठिकाणी मशीनमध्ये छेडछाळ करण्यात आली. याप्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत त्या मशीन सीलबंद आणि सुरक्षित ठेवाव्यात अशी मागणी आम्ही केल्याचं” त्यांनी सांगितलं.
पुढ बोलताना, उर्वरित तक्रारी येत्या ४८ तासांत निवडणूक आयोगाकडे सादर करणार असून निवडणूक आयोगाने आम्हाला उत्तर देण्याचे आश्वासन दिले आहे, असेही ते म्हणाले. तसेच आज आम्ही २० मतदारसंघातील तक्रारींचे कागदपत्रे आयोगाकडे सादर केले असून आणखी १३ विधानसभा मतदारसंघातील तक्रारी निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहोत, अशी माहिती पवन खेरा यांनी दिली.