पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी युपी, बिहारच्या भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका वक्तव्य केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. यानंतर भाजपा आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून चरणजीत सिंग चन्नी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे. उत्तर प्रदेशातही निवडणुका होत असल्याने या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. विशेष म्हणजे चरणजीत सिंग चन्नी यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी त्यांच्या शेजारी उभ्या होत्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही इंडिया टुडेशी बोलताना या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
चरणजीत सिंग चन्नी यांच्या विधानावर भाजपा आक्रमक झाली असून हा बिहार आणि उत्तर प्रदेशच्या लोकांचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान चरणजीत सिंग चन्नी यांनी आपण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उल्लेखून म्हटलं होतं असं सांगत सावरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान काँग्रेस आणि पंजाबचे मुख्यमंत्री मतांसाठी देशाचं विभाजन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
“उत्तर प्रदेश, बिहारमधील भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका”; मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने गदारोळ
“गांधी आणि नेहरुंच्या नावाखाली काँग्रेस वारंवार देशाची फसवणूक करत आहे,” अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. “जातीवाद, क्षेत्रवाद, भाषावाद, नक्षलवाद, दहशतवाद या सर्व जखमा काँग्रेसने देशाला दिल्या आहेत. काँग्रेस पुन्हा त्याची पुनरावृत्ती करत आहे,” असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
चरणजीत सिंग यांच्या वक्तव्यावर टीका करताना ते म्हणाले की, “पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी संत रविदास यांच्याकडून प्रेरणा घेत असं वक्तव्य करण्यापासून स्वत:ला रोखायला हवं होतं”. पुढे ते म्हणाले की, “मुख्यमंत्री चन्नी रवीदास जंयतीच्या निमित्ताने वाराणसीत आले होते. जर त्यांनी त्यांच्याकडून काही प्रेरणा घेतली असती तर त्यांनी असं कोणतंही नकारात्मक वक्तव्य केलं नसतं”.