लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत. २० मे रोजी पाचवा टप्पा पार पडणार आहे, तर २५ मे रोजी सहावा आणि १ जून रोजी सातवा टप्पा पार पडणार आहे. अशात नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा ४०० पारचा नारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ४० जागाही निवडून येणार नाहीत असंही मोदींनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय म्हटलंय?

“उत्तर प्रदेशात काँग्रेसला खातंही उघडता येणार नाही. रायबरेलीतून राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत. मात्र त्यांना वायनाडमधून का पळून जावंसं वाटलं? त्यांना पराभव समोर दिसतो आहे. राहुल गांधींनी त्यांची भाषा फारच तीव्र केल्याचंही दिसतं आहे. त्यांच्या तोंडाला येईल तसं ते बोलत आहेत. केरळमध्ये राहुल गांधी काय आहेत हे कळलं आहे. केरळने त्यांना धडा शिकवलाय. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना टोला

उत्तर प्रदेशातले मतदार हे उदारमतवादी आहेत. जे आत्ता रायबरेलीतून आमच्या विरोधात लढत आहेत ते अमेठीतून हरले होते. अमेठीत ते एकदा तरी गेले का? असा प्रश्न नरेंद्र मोदींनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत विचारला आहे. तसंच ट्रकवरुन प्रचार करुन आणि काळ्या रंगाचं जॅकेट घालून काहीही होत नाही असं म्हणत त्यांनी अखिलेश यादव आणि राहुल गांधींनाही टोला लगावला.

उत्तर प्रदेशने घराणेशाही नाकारली आहे

उत्तर प्रदेशच्या जनतेने घराणेशाहीला नाकारलं आहे. आता घराणेशाही उत्तर प्रदेश कधीही स्वीकारणार नाही. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत आणि लोकांनी त्या स्वीकारल्या आहेत, त्यामुळे अनेक गोष्टींमध्ये बदल होत आहेत. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

दिल्लीत भाजपाचं सरकार आहे ही बाब उत्तर प्रदेशसाठी चांगली आहे. माझ्या बरोबर जी टीम काम करते आहे ती सगळी चांगली माणसं आहेत. मला हे माझं नशीबच वाटतं. योगी आदित्याथ असोत किंवा अमि शाह असोत मला चांगले सहकारी लाभले आहेत. लोकसभा निवडणुकीत ४०० पारच्या पुढे जाणार हा विश्वास आम्हाला आहे. तर काँग्रेस ४० जागाही निवडून येणार नाही. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “भाजपाला २३३ तर एनडीएला…”, लोकसभा निवडणूक निकालांबाबत योगेंद्र यादव यांचं मोठं भाकित; Video मध्ये मांडलं जागांचं गणित!

शरद पवारांबाबत काय म्हणाले मोदी?

शरद पवारांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील हे वक्तव्य केलं. त्यांचं हे वक्तव्य बारामतीच्या निवडणुकीनंतर त्यांनी केलं. शरद पवार यांनी जे वक्तव्य केलं ते महत्वाचं मानलं पाहिजे. शरद पवार जर हे म्हणत असतील तर काँग्रेसलाही बहुदा छोटे पक्ष बरोबर घेतल्याशिवाय आपण मोठे आहोत हे दाखवता येणार नाही. असा टोलाही नरेंद्र मोदींनी लगावला आहे.