पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान असतील जे जनतेसमोर जाऊन रडतात, अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी नुकतीच केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसकडून सोशल मीडियावर CryPMPayCm असा हॅशटॅग चालवून भाजपावर हल्लाबोल केला आहे. बागलकोट येथील जाहीर सभेला संबोधित करत असताना वाड्रा म्हणाल्या, “मी पहिल्यांदाच असे पंतप्रधान पाहत आहे, जे लोकांसमोर येऊन रडत आहेत आणि त्यांचा छळ केल्याचे सांगत आहेत. तुमच्या (जनतेच्या) तक्रारी ऐकून घेण्याऐवजी ते स्वतःच्याच व्यथा मांडत आहेत. पंतप्रधान कार्यालयातील लोक एक यादी बनविण्याच्या कामाला जुंपले गेलेले आहेत. ही यादी तुमच्या प्रश्नांची नाही, तर पंतप्रधान मोदींना कोण काय बोलले याची आहे. मला वाटते त्यांची यादी एका पानातच संपत असेल. भाजपाच्या नेत्यांनी माझ्या परिवारावर जी चिखलफेक केली, त्याची यादी तयार करायची झाल्यास एकामागून एक पुस्तके छापावी लागतील.”
प्रियंका गांधी वाड्रा यांनी ज्या विषयावर आरोप केला, तोच धागा पकडून काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाने भाजपाला धारेवर धरले. यासोबतच कर्नाटक सरकारने केलेल्या विविध भ्रष्टाचारांचीही माहिती सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येत आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये, बंगळुरूमध्ये एका क्यूआर कोडसह फलक लावून PayCM असे कॅप्शन देण्यात आले होते. सरकारी कंत्राट देण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे सरकार ४० टक्के कमिशन मागत असल्याचा आरोप करण्यात आला होता, त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून क्यूआर कोड देऊन सरकारच्या विरोधात अनोखे आंदोलन करण्यात आले होते.
काँग्रेसचे राज्यसभा खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांनी रविवारी प्रियंका गांधी वाड्रा यांच्या भाषणाचा व्हिडीओ पोस्ट करून लिहिले की, #CryPMPayCM यांनी कर्नाटकच्या जनतेचे ऐकायला सुरुवात करावी. हाच एकमेव राजधर्म आहे. तसेच कर्नाटक सरकारला जबाबदार, उत्तरदायी आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार हवे आहे. असे सरकार फक्त काँग्रेसच देऊ शकते.
भाजपाने त्यांचा जाहीरनामा सोमवारी प्रसिद्ध करताच, काँग्रेसचे नेते बीवाय श्रीवत्स यांनी ट्वीट करत म्हटले की, २०१८ साली दिलेल्या जाहीरनाम्यातील ९० टक्के बाबी पूर्ण झालेल्या नाहीत. #CryPMPayCM च्या ४० टक्के कमिशन घेणाऱ्या भाजपा सरकारने आणखी बोगस जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
श्रीवत्स पुढे म्हणाले की, कर्नाटकाच्या प्रत्येक मतदाराला काँग्रेसची पंचसूत्री माहीत आहे. काँग्रेस सरकारने २०१३-२०१८ या कळात आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांपैकी ९० टक्के वचने पूर्ण केलेली आहेत आणि मतदारांना याची कल्पना आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्वीट करत म्हटले की, कर्नाटकातील लोक ४० टक्के कमिशनवाल्या सरकारला घरी बसवतील आणि १०० टक्के कमिटमेंट असणाऱ्या काँग्रेसला निवडून देतील.
खरगे यांचे पुत्र आणि चित्तापूर येथील काँग्रेसचे आमदार प्रियांक खरगे यांनी म्हटले की, विरोधकांनी किती वेळा टीका केली, ही यादी वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ आहे, पण कर्नाटकच्या नोंदणीकृत कंत्राटदार संघटनेने भाजपा सरकारच्या विरोधात ४० टक्के कमिशनचा आरोप केलेले पत्र वाचायला त्यांच्याकडे वेळ नाही. पंतप्रधान मोदी जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी खोटे बोलत आहेत.
हे वाचा >> “नालायक बेटा असेल तर…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खरगेंच्या मुलाकडून टीका, म्हणाले…
द्रमुक पक्षानेही काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रचारात सहभाग घेतला आहे. पक्षाचे अधिकृत प्रवक्ते सर्वानन अन्नादुराई म्हणाले की, प्रियंका गांधी यांचे वक्तव्य भाजपासाठी डोकेदुखी ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच रडत असतात. विरोधकांनी ९१ वेळा माझा अवमान केला, असे ते सांगतात. आमच्या कुटुंबाचा किती वेळा अवमान करण्यात आला, याची जर गणती केली तर आम्हालाही पुस्तक छापावे लागेल, असे ते म्हणाले.
दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीही रडलेले नाहीत. काँग्रेस पक्षच मागच्या नऊ वर्षांपासून रडत आहे. आता लोकांनादेखील त्यांच्याबद्दल काहीच सहानुभूती राहिलेली नाही.