कुणाल लाडे, लोकसत्ता, डहाणू
Dahanu BVA : डहाणू विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडी कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सुरेश पाडवी यांनी मतदानाला एक दिवस शिल्लक असताना भाजप मध्ये प्रवेश करत भाजपाचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बहुजन विकास आघाडीच्या ( Dahanu BVA ) उमेदवाराचा ऐन वेळी घेतलेल्या निर्णयामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून निवडणुकीत मते खाण्यापेक्षा योग्य उमेदवाराला मते मिळावी यासाठी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुरेश पाडवी यांनी दिली आहे.
एक दिवस उरलेला असताना बविआचा उमेदवार भाजपात
डहाणू विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार विनोद निकोले आणि भाजपचे विनोद मेढा यांच्यामध्ये मुख्य लढत असून बहुजन विकास आघाडी ( Dahanu BVA ), मनसे, जिजाऊ संघटना पुरस्कृत आणि इतर तीन असे एकूण आठ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान प्रत्यक्ष मतदानाला एक दिवस शिल्लक असताना बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवी ( Dahanu BVA ) यांनी निवडणुकीत उभे असताना भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश करत भाजपला पाठिंबा दिल्यामुळे डहाणू विधानसभेतील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
विरारमध्ये कॅशकांड, डहाणून बविआला धक्का
डहाणू विधानसभा निवडणुकीत महायुती भाजप आणि माहविकास आघाडी माकप मध्ये मुख्य लढत आहे. दरम्यान या निवडणुकीत उभे राहिलेल्या इतर उमेदवारांमुळे मत विभागणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवाराने ( Dahanu BVA ) ऐनवेळी नांगी टाकल्यामुळे बहुजन विकास आघाडीला मोठा फटका बसला आहे.
सुरेश पाडवी यांनी काय म्हटलंय?
निवडणुकीत मते वाया जाण्यापेक्षा ती मते योग्य उमेदवाराला मिळाल्यास आमच्या ग्रामीण भागाचा विकास करता येईल. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर मी भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. असं सुरेश पाडवी, बहुजन विकास आघाडी ( Dahanu BVA ) उमेदवार यांनी म्हटलं आहे.
विरारमधलं कॅशकांड काय?
विरारच्या एका हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला आहे. भाजपा आणि बविआ कार्यकर्ते आपापसांत भिडले असून पोलिसांनी हॉटेल सिल केले आहे. आमदार क्षितीज ठाकूर हे घटनास्थळी असून तणाव वाढला आहे. बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेरून त्यांच्या अंगावरच पैशांची पाकिटे रिकामी केली. विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आले होते. ते हॉटेलमध्ये महिलांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. ही गोष्ट सर्वत्र पसरली आणि कार्यकर्ते हॉटेलमध्ये जमू लागले. बविआचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले आणि वादावादी सुरू झाली. काही वेळातच आमदार क्षितीज ठाकूर देखील हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी हॉटेलमध्ये सापडलेली पैशांची पाकिटे तावडे यांना दाखवली. यावेळी भाजप आणि बविआ कार्यकर्ते आपापसात भिडले