उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी एकीकडे सर्वच पक्ष उमेदवारांची नावे जाहीर करुन उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत, तर दुसरीकडे विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे. शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी निवडणूक प्रक्रियेवरुन भाजपावर हल्लाबोल केला आहे. निवडणूक व्यवस्थेवर वर्चस्व गाजवणे लोकशाहीला शोभणारे नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. भाजपा शिवसेनेच्या उमेदवारांना घाबरत असल्याने त्यांचे अर्ज रद्द करण्यात आल्याचे संजय राऊतांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशात स्वबळावर लढणाऱ्या शिवसेनेच्या सात उमेदवारांचे अर्ज आतापर्यंत रद्द करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात निवडणूक अधिकारी आणि जिल्हा प्रशासन भेदभाव करत असून उमेदवारांना धमकावले जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत शिवसेनेच्या उमेदवारांना निवडणूक लढण्यापासून रोखले जात असल्याचे म्हटले आहे.
“उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्या भेदभावाचा आतापर्यंत सात शिवसेना उमेदवारांना फटका बसला आहे. आमच्या उमेदवारांना धमकावले जात आहे, निवडणूक लढवण्यापासून रोखले जात आहे. ही कसली लोकशाही? निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे. आम्ही झुकणार नाही,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
“उत्तर प्रदेशात काय चाललंय? बरहापूर,बिजनौर येथील शिवसेनेच्या उमेदवाराने ठरलेल्या वेळेत दुपारी २.५० वाजता अर्ज सादर केला आणि निवडणूक अधिकाऱ्यांनीही मंजुरी दिली. आता जिल्हाधिकारी उमेदवाराला अर्ज उशिरा आल्याने तो रद्द होईल, असे सांगत आहेत. भाजपासाठी सुरु असलेली खुशामती खपवून घेतली जाणार नाही. निवडणूक आयोगाने याची नोंद घ्या,” असे संजय राऊत पुढे म्हणाले.
याआधीही संजय राऊत यांनी ट्विट करत, “उत्तर प्रदेशमध्ये भाजपा शिवसेनेच्या उमेदवारांना घाबरत आहे. आतापर्यंत सहा उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. आमच्या नोएडाच्या उमेदवाराचा अर्ज विनाकारण नाकारण्यात आला. निवडणूक अधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी सुनावणीसाठी तयार नाहीत. निवडणूक यंत्रणेवर दबावाचे वर्चस्व लोकशाहीसाठी चांगले नाही,” असे म्हटले होते.