महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडत आहे. या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वाधिक लक्ष लागलेले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच त्यांच्या आई आशाताई पवार यांच्याबरोबर येत मतदान केले. यावेळी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. यावेळी अजित पवार यांनी माझी आई माझ्याबरोबर आहे, असं म्हटलं. तसेच याची सर्वांनी नोंद घ्यावी असंही त्यांनी स्पष्ट केलं. यानंतर मात्र, अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार आणि आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली. यावर आता अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत ‘मी फक्त आईला मतदानाला बरोबर आणले तर तुम्हाला एवढ्या मिरच्या झोंबल्या’, असा हल्लाबोल त्यांनी केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्याचे वृत्त समोर येत आहे. तसेच निवडणूक आयोगाने अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रलोभनाबाबत कोणतेही विधान न करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मला आतापर्यंत तीन नोटीसा आलेल्या आहेत. या तीनही नोटीसला मी उत्तर दिलेले आहे. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे आणि मला पुन्हा नोटीस आली हे मी माध्यमांतच ऐकत आहे. त्यामुळे नोटीस काढण्याचा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी ज्यांना नोटीसा काढल्या त्यांना त्या नोटीसला उत्तर देण्याचा अधिकार असून त्यावर योग्य ते उत्तर देऊ “, असेही ते म्हणाले.
हेही वाचा : “माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं होतं?”, अजित पवारांचा शरद पवारांना थेट प्रश्न
अजित पवार काय म्हणाले?
“माझी आई कालही, आजही आणि उद्याही माझ्याबरोबर असेल. माझ्या वडीलांच्या निधनानंतर मी आईला जो आधार दिला, तो इतर कोणीही दिला नाही. याबाबत माझ्या जवळच्या कोणालाही विचारले तरी कुणीही सांगेल. मी माझ्या आईला मतदानाला घेऊन गेलो, ते एवढं त्यांच्या नाकाला झोंबलं. आपल्या घरात वयस्कर कुणी असेल तर त्यांना आधार आपण देतो. समोरचे लोकही शरद पवार यांना आधार देऊनच पुढे घेऊन जातात ना”, असा निशाणा अजित पवारांनी साधला.
“मी दोन तीन सभेत त्यांच्या बैठकीची व्यवस्था पाहिली. निवडणुकीची जी सांगता सभा झाली तेव्हा आणि त्याआधीच्या सभेत त्यांचे संपूर्ण कुटुंब तेथे बसले होते. त्यामध्ये कहर म्हणजे एकजणाने शरद पवार यांचा फोटो मांडीवर ठेवला होता. आता शरद पवार समोर असताना मांडीवर फोटो ठेवण्याची काय गरज होती? शरद पवार व्यासपीठावर बसले आहेत, तेथून काही मार्गदर्शन करत आहेत. मग तरीही मांडीवर फोटो ठेवला. आता ज्यांच्या मांडीवर फोटो होता, मी त्यांना अनेक वर्ष ओळखतो, त्यांचं हे काम नाही. मात्र, त्यांना कोणीतरी मांडीवर फोटो ठेवायला लावला”, असा आरोप अजित पवार यांनी केला.
अजित पवार पुढे म्हणाले, “मी ज्या कुटुंबांमधून येतो, त्यातील काही लोक कोणत्या पातळीवर चाललेत? समोरच्यांकडून सर्व कुटुंब आमच्याबरोबर असल्याचे दाखवण्यात येत आहे. ज्या आईने मला जन्म दिला, त्या आईला फक्त मतदानासाठी घेऊन गेलो, तर तुम्हाला एवढ्या मिरच्या झोंबतात. पण या निवडणुकीच्या काळात तुम्ही काय काय उद्योग केले ते जनतेने पाहिले नाहीत का?”, असा सवाल अजित पवार यांनी केला.