लोकसभा निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे हे दिसतं आहे. कारण भाजपाने ४०० पारचा नारा दिला आहे. तर इंडिया आघाडीनेही कंबर कसली आहे. देशात सात टप्प्यांमध्ये तर महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. अशात महाराष्ट्रातली सर्वात रंगतदार निवडणूक होणार आहे ती म्हणजे बारामतीतली. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार म्हणजेच नणंद विरुद्ध भावजय असा थेट सामना आहे. शरद पवारांपासून फारकत घेतलेल्या अजित पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आता बारामतीबाबत देवेंद्र फडणवीसांनी केलेलं वक्तव्यही चर्चेत आहे.
मनसेबाबत महत्त्वाचं वक्तव्य
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आमच्याबरोबर यावं अशी आमची इच्छा आहे. राज ठाकरे यांनी २०१४ मध्ये मोदींना पाठिंबा दिला होता. मधल्या काळात ते आमच्यापासून दूर गेले होते. मात्र आता ते हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जात आहेत. तो विचार आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. ते जर बरोबर आले तर आम्ही स्वागतच करु पण पक्ष त्यांचा आहे निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच त्यांनी उरलेल्या जागांबाबतही भाष्य केलं.
लवकरच उर्वरित जागावाटप
महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. जागा निश्चित झाल्या आहेत सगळ्या उर्वरित जागा आम्ही आता एकत्रित रित्या जाहीर करु असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात आमच्या थोड्या जागा राहिल्या आहेत. त्यावर एकमतही झालं आहे. असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
सुप्रिया सुळेंना मत म्हणजे राहुल गांधींना मत
भारतीय जनता पक्षामध्ये मोदींवर विश्वास ठेवून कुणीही प्रवेश केला तरीही आमचा विरोध नाही. अधिकृतरित्या आम्हाला कळवलं गेलं की आम्ही एकनाथ खडसेंचंही स्वागतच करु. माझा शरद पवारांना सवाल आहे, शरद पवार बारामतीत उमेदवार नाहीत. सुनेत्रा पवार निवडून आल्या तर मोदींसाठी हात उंचावतील आणि सुप्रिया सुळे निवडून आल्या तर राहुल गांधींसाठी हात उंचावतील. म्हणजेच काय सुनेत्रा पवार यांना दिलेलं मत हे मोदींना दिलेलं मत आहे, सुप्रिया सुळेंना दिलेलं मत हे राहुल गांधींना दिलेलं मत आहे. हे काही लोकांना समजत नसेल तर आम्ही काय करणार? असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.