शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ कोपरगावमध्ये आज महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीसह उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच या सभेत बोलताना त्यांनी सदाशिव लोखंडे यांच्याबाबत सूचक भाष्य केले. यावेळेस संधी पक्की, पण पुढच्या वेळचा काही भरोवसा नाही, असे सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“आज आपण खासदार निवडण्यासाठी सभेत एकत्र आलो आहोत. शिर्डी लोकसभा मसदारसंघ हा देशभरात चर्चेत असतो. त्यामध्ये जर शिर्डीचा खासदार म्हटलं तर एक वेगळा सन्मान मिळतो. देशभरातली लोक शिर्डीच्या खासदारांकडे एका वेगळ्या नजरेने पाहतात. देशभरातील लोकांचं लक्ष शिर्डीकडे असते. त्यामुळे ही निवडणूक साधी निवडणूक नसून देशाची निवडणूक आहे”, असे फडणवीस म्हणाले.

“दोन राजकीय भागाचा आपण विचार केला तर एकीकडे आपली महायुती आणि दुसरीकडे इंडिया आघाडी आहे. आपली महायुती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृ्त्वात तयार झाली आहे. दुसरीकडे राहुल गांधी आहेत. त्यांच्याकडे राहुल गांधी यांना कोणीही नेता मानायला तयार नाही. इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल असे त्यांना विचारले तर ते आज काहीही सांगू शकत नाहीत. ते देशात पाच पंतप्रधान करतील. मात्र, त्यांचा पहिला पंतप्रधान कसा निवडतील, हा प्रश्न आहे, असा हल्लाबोल फडणवीसांनी विरोधकांवर केला.

हेही वाचा : “माझ्याकडे आदित्यचे फोटो असल्याचं सांगत तुम्ही…”, प्रियांका चतुर्वेदींवर शिंदे गटाचा हल्लाबोल

“आघाडीवाले हे एक संगीत खुर्ची ठेवतील. त्या खुर्चीच्या आजूबाजूला हे २४ लोकं फिरणार. त्यानंतर संगीत बंद झाले की एक उमेदवार खुर्चीवर बसेल, असे पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा यांचा मानस आहे. मी त्यांना सांगतो हा देश आहे, खासगी कंपनी नाही. इंडिया आघाडीकडे या देशासाठी निती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीचे मजबूत इंजिन आहेत. वेगवेगळे पक्ष महायुतीच्या डब्बामध्ये आहेत. आता महायुतीच्या डब्बामध्ये सर्वांना बसण्यासाठी जागा आहे. मात्र, इंडिया आघाडीकडे शरद पवार यांच्याकडे सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या इंजिनध्ये फक्त आदित्य ठाकरे यांच्यासाठी जागा आहे”, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

उद्धव ठाकरे यांनी ज्यांना तूप चोर म्हटलं त्यांनाच आता शिर्डीत उमेदवारी दिली. उद्धव ठाकरे हे प्रचार करत आहेत. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेत. मी सांगतो ही गल्लीची नाही तर दिल्लीची निवडणूक आहे. आज या व्यासपीठावर तीन-चार महिला आहेत. पण २०२६ नंतर अर्धा मंच महिलांचा असेल. कारण २०२६ नंतर ३३ टक्के महिला आमदार आणि खासदार होणार आहेत. त्यामुळे सदाभाऊ (सदाशिव लोखंडे) यावेळेस संधी पक्की आहे. पण पुढच्या वेळचा भरोवसा नाही. पुढच्या वेळेस महिला खासदार होताना दिसतील”, असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis on shirdi lok sabha constituency shivsena candidate sadashiv lokhande gkt
Show comments