शिरुरमधल्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी अमोल कोल्हेंवर जोरदार टीका केली आहे. शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशहिताचे निर्णय कसे घेतले ते सांगितलं. त्यानंतर त्यांनी अमोल कोल्हेंवर जोरदार टीका केली.अमोल कोल्हे यांचा उल्लेख नाटकी माणूस असा त्यांनी केला. त्यांचं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?

” आढळराव पाटील यांनी मागच्या पंधरा वर्षांत किती प्रश्न विचारलेत तुम्ही रेकॉर्ड बघा. बैलगाडा शर्यत बंद झाली होती अडीच वर्षे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांनी काहीही केलं नाही. आपलं सरकार परत आलं आणि आपण बैलगाडा शर्यत सुरु केली. त्यामागेही आढळराव पाटील यांचेच प्रयत्न होते. आता त्यांच्यावर आरोप केला जातो की पक्ष बदलला. मात्र आज तुम्हाला मी सत्य सांगतो, मी, अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र बसलो. ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली. शिवसेनेचाही आग्रह होता. शेवटी मधला मार्ग काढला सीट राष्ट्रवादीच्या कोट्यात असली तरीही उमेदवार आढळराव पाटील यांनाच करु. दोन्ही पक्षांना समाधान वाटेल. आम्ही तिघेही एकाच विचाराने बरोबर आलो आहोत. ” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हे पण वाचा Shivajirao Adhalrao on Kolhe: “ते दिशाभूल करत असून…”, कोल्हेंच्या आरोपांवर आढळरावांचं प्रत्युत्तर!

अमोल कोल्हेंवर टीका

जे आमच्यावर टीका करत असतील तर जरा त्यांनी समोरच्या उमेदवाराला (अमोल कोल्हे) विचारा की त्यांनी किती वेळा निष्ठा बदलल्या. गेल्या पाच वर्षांत किती वेळा फेसबुक पोस्ट टाकल्या आणि कुठे जाणार होते आणि कसे थांबले ते आम्ही सांगायला लागलो तर त्यांचा चेहरा उघड होईल. मात्र एक गोष्ट आहे आढळरावांपेक्षा एक गोष्ट त्यांना (अमोल कोल्हे) चांगली जमते. आढळराव नाटक करत नाहीत. ते एवढं नाटकी आहेत की त्यांना रडता येतं, हसता येतं, जुमलेबाजी करता येते, बोलता येतं, जुमलेबाजी करता येते. पण एक लक्षात ठेवा, लोक नाटकाचं तिकिट घेऊन एकदा नाटक बघायला जातात. पण नाटक फ्लॉप असेल तर कुणीही नाटक बघायला परत जात नाही. शिरुरच्या जनतेने एकदा तिकिट घेतलं.

शिरुरचे लोक खूप हुशार आहेत

शिरुरचे लोक खूप हुशार आहेत. पाच वर्षे हा व्यक्ती (अमोल कोल्हे) या ठिकाणी फिरकलाही नाही. आता ते गावोगावी जात आहेत. पण शिरुरचे लोक त्यांना विरोध वगैरे करत नाहीत. शिव्याही देत नाही, बोलवतात, स्वागत करतात, हार घालतात आणि सत्कार करतात. समोरच्याला वाटतं वा काय स्वागत झालंय माझं. पण सत्कार झाल्यावर विचारतात पाच वर्षे कुठे होते तुम्ही? जबरदस्त लोक आहात तुम्ही सगळे. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. आता या सगळ्या टीकेला अमोल कोल्हे उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis slams amol kolhe in shirur rally says he is drama king scj