उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीमध्ये झालेल्या विनायक राऊत यांच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. आज मोदींनी ज्या ज्या भ्रष्टाचाऱ्यांना बरोबर घेतलं आहे ते पाहून अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी खरमरीत उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका करणं म्हणजे सूर्याकडे थोबाड करुन थुंकण्याचा प्रकार आहे असं वक्तव्य फडणवीसांनी केलं आहे. सोलापुरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– IPL2 Quiz

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

आयपीएलमध्ये नाही का खेळाडू एका टीममधून दुसऱ्या टीम दुसऱ्या टीममध्ये जातो तसं भारताच्या राजकारणाचं झालं आहे. आयपीएल इंडियन पॉलिटिकल लीग. मोदी कितीही काही बोलतील पण २०१४ आणि २०१९ चा आत्मविश्वास मला दिसतच नाही. २०१९ मध्येही आपण फसलो होतो. तेव्हा रुबाब होता कारण शिवसेना बरोबर होती, त्यावेळी ५६ इंची छाती होती आता त्यातली हवाही गेली कारण आजूबाजूला सगळे भ्रष्टाचारी अशी गत झाली आहे. आता अटलबिहारी वाजपेयींचा आत्मा ढसाढसा रडत असेल. ही सगळी काय गत केली भाजपाची असं त्यांच्या आत्म्याला वाटत असेल. याच टीकेला आता फडणवीसांनी खास आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.

हे पण वाचा- मोदींमुळे भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची चीनचीही हिंमत नाही, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

उद्धव ठाकरेंनी केलेलं विकासाचं एक काम दाखवावं

उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आयुष्यात केलेलं एक विकास काम दाखवा. मी पुन्हा सांगतोय फक्त एक विकास काम दाखवा. उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याची गरज आम्हाला नाही कारण संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला विकास पाहतो आहे. अडीच वर्षे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी महाराष्ट्राचा विकास होईल असं एकही काम केलं नाही.

उद्धव ठाकरेंची टीका म्हणजे सूर्याकडे थोबाड करुन थुंकण्याचा प्रकार

उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका करणं म्हणजे सूर्याकडे थोबाड करुन थुंकण्याचा प्रकार आहे. तसंच संजय राऊत ही कोण व्यक्ती आहे ते मला माहीत नाही. उद्धव ठाकरेंनी ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मोदींवर उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

भारतात राम राम करायचे नाही तर पाकिस्तानात करायचे का?

आम्ही रामाचं नाव घेतो याचा ठाकरेंच्या शिवसेनेला राग का येतो? भारतात राम-राम करायचे नाही तर काय पाकिस्तानात जाऊन करायचे का? आम्ही राम-राम म्हणणारच असंही देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं आहे. आता यावर उद्धव ठाकरे काही प्रत्युत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis slams uddhav thackeray at solapur over his comment on pm modi scj