Delhi Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल काल (शनिवारी) जाहीर करण्यात आले. यामध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजपा) दिल्लीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. आम आदमी पक्षाला (आप) सत्तेतून बाहेर काढत भाजपाने २७ वर्षांनंतर देशाच्या राजधानीत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार भाजपाने या निवडणुकीत दिल्लीतील ७० पैकी ४८ जागांवर विजय मिळवला आहे, तर आम आदमी पक्षाला २२ जागा जिंकता आल्या. काँग्रेस पक्षाला सलग तिसर्यांदा दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचे अनेक बड्या नेत्यांना त्यांच्या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला आहे. यामध्ये आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज, माी मंत्री सोमनाथ भारतीआणि सत्येंद्र जैन, अवध ओझा, दुर्गेश पाठक यांचा समावेश आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांचा मात्र कालकाजी मतदारसंघातून विजय झाला आहे.
भाजपाचे परवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा ४०८९ मतांनी पराभव केला, त्यांना ३००८८ मते मिळाली तर केजरीवाल यांना २५९९९ मते मिळाली. जंगपुरा येथे सिसोदिया यांचा भाजपाचे तरविंदर सिंग मारवाह यांच्याकडून फक्त ६७५ मतांनी पराभव झाला, तर मंत्री सौरभ भारद्वाज यांचा ग्रेटर कैलाश येथे भाजपाच्या शिखा रॉय यांनी ३१८८ मतांनी पराभव केला.
सर्वाधिक फरकाने झालेले विजय
दिल्ली निवडणुकीत मतिया महल येथून आम आदमी पक्षाचे उमेदवार आले मोहम्मद इक्बाल यांनी सर्वाधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपाच्या दीप्ती इंदोरा यांचा पराभव करून ४२७२४ मतांनी ही निवडणूक जिंकली. दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य सीलमपूरमध्ये पाहायला मिळाले. येथे आपचे उमेदवार चौधरी जुबैर अहमद यांनी भाजपाचे अनिल कुमार शर्मा यांचा ४२४७७ मतांनी पराभव केला. हे रोहिणी मतदारसंघातून भाजपाचे विजेंदर गुप्ता हे देखील मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यांनी आपचे प्रदीप मित्तल यांचा ३७८१६ मतांनी पराभव केला.
सर्वात कमी मतांच्या फरकाने झालेले विजय
सर्वात कमी मतांच्या फरकाने झालेला विजय हा भाजपाच्या चंदन कुमार चौधरी यांचा ठरला. त्यांनी संगम विहार येथे अवघ्या ३४४ मतांच्या फरकारन दिनेश मोहनिया या आपच्या उमेदवाराचा पराभव केला, त्यांना ५३७०५ इतकी मते मिळाली.
दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात कमी मताधिक्याने झालेला विजय हा अवघ्या ३९२ मतांच्या फरकाने झाला. त्रिलोकपुरी येथून भाजपाचे रवी कांत यांनी आपच्या अंजना परचा यांना पराभूत केले.
जंगपुरा येथे तरविंदर सिंग मारवा हे भाजपाचे उमेदवार विजयी झाले. त्यांनी आपचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा ६७५ मतांनी पराभव केला. तर तिमपूर येथे भाजपाचे सूर्य प्रकाश खत्री यांनी आपचे सुरिंदर पाल सिंग यांना ११६८ मतांनी हरवले. राजेंद्र नगर येथे भाजपाच्या उमंग बजाज या देखील १२३१ मतांच्या फरकान विजयी झाल्या, त्यांनी आपचे उमेदवार दुर्गेश पाठक यांना पराभूत केले.