Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं होतं. त्यानंतर आज ८ फेब्रुवारी रोजी या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. दुपारी २ वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारतीय जनता पक्ष ४७ जगांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पक्ष २२ जागांवर आघाडीवर आहे. पुढील काही वेळात दिल्लीच्या निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, दुपारपर्यंत समोर आलेल्या कलानुसार दिल्लीत भाजपाचं सरकार स्थापन होईल असं चित्र दिसत आहे. दरम्यान, दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला सर्वात मोठा धक्का बसला आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया या दोन मोठ्या नेत्यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे दिल्लीच्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीत आहेत. मात्र, तरीही काँग्रेस आणि ‘आप’ने एकत्र निवडणूक न लढवता स्वतंत्रपणे लढवली. त्यामुळे याचाच फटका काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला बसल्याचं आता बोललं जात आहे. यासंदर्भाने बीआरएस पक्षाचे कार्याध्यक्ष केटी रामाराव यांनी प्रतिक्रिया देत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर खोचक टीका केली आहे. ‘विजय भाजपाचा, पण अभिनंदन राहुल गांधी यांचं’, असं केटी रामाराव यांनी म्हटलं आहे.
बीआरएसच्या कार्याध्यक्षांनी काय म्हटलं?
दिल्ली निवडणुकीच्या निकालांवर बीआरएसचे कार्याध्यक्ष केटी रामाराव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केटी रामाराव यांनी म्हटलं की, “दिल्ली निवडणुकीने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की राहुल गांधी भाजपाला पराभूत करण्यास असमर्थ आहेत. ते स्वतः जिंकू शकत नाहीत आणि प्रादेशिक पक्षांना कमकुवत करतात आणि अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करतात. मी राहुल गांधींचे अभिनंदन करतो की त्यांनी आणखी एक विजय भाजपाला मिळवून दिला आहे. याची खात्री करून घेतल्याबद्दल मी राहुल गांधींचे अभिनंदन करतो”, अशी खोचक प्रतिक्रिया केटी रामाराव यांनी म्हटलं आहे.
#WATCH | Hyderabad, Telangana: On Delhi election results, BRS Working President KT Rama Rao says, "Delhi elections have proved yet again that Rahul Gandhi is incapable of defeating the BJP… He cannot win by himself and also ends up weakening the regional parties and indirectly… pic.twitter.com/v9WshKjkJh
— ANI (@ANI) February 8, 2025
अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदियांचा पराभव
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघामधून अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पराभव हा आम आदमी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
आम आदमी पक्षाचे मनिष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र, मनिष सिसोदिया यांचाही पराभव झाला आहे. तरविंदर सिंग मारवाह या ठिकाणाहून विजयी झाले आहेत. याआधी दोन निवडणुका मनिष सिसोदिया जिंकले होते. त्यांनी पटपडगंजमधून निवडणूक लढवली होती. यावेळी मात्र सिसोदियांचा पराभव झाला आहे. त्यांना हरवणारे मारवा २०२२ भाजपात आले होते. त्याआधी ते काँग्रेसमध्ये होते तसंच माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात होते. मारवा हे भाजपाच्या शिख नेत्यांपैकी एक महत्त्वाचे नेते आहेत.