२०१९ च्या निवडणुकीत ४१ खासदार निवडून आले तो रेकॉर्ड आम्ही यावेळी मोडणार आहोत. त्या खासदारांमध्ये आमच्या पंकजा मुंडे जशा असणार आहेत तसेच आमचे महादेव जानकरही असणार आहेत. मोदींशी जेव्हा माझं बोलणं झालं की आज महादेव जानकर यांचा फॉर्म भरायला चाललो आहोत तेव्हा त्यांनी निरोप पाठवला. जानकर जी से कहियें, मै लोकसभामें उनका इंतजार कर रहाँ हूँ. हा निरोप सांगत देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकर यांच्या प्रचार सभेत भाषण केलं.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मागच्या दहा वर्षांत २५ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेबाहेर काढण्याचं काम मोदींनी करुन दाखवलं. मोदींनी मूठभर लोकांसाठी काम केलं नाही. तर त्यांनी गरीबांसाठी कामं केली आहेत. आपल्या देशातली ही बाब पाहून विकसित देशांनाही आश्चर्य वाटतं. जे जगातल्या देशांना जमलं नाही ते मोदींनी करुन दाखवलं असंही फडणवीस म्हणाले. गरीबांना पाणी मिळालं पाहिजे, वीज मिळाली पाहिजे, घरं मिळाली पाहिजेत, महिलांना शौचालय मिळालं पाहिजे, मुद्रा लोन, स्कॉलरशिप सारं काही मिळालं पाहिजे. त्यासाठी मोदी दहा वर्षांपासून प्रयत्न करत असल्याने हे परिवर्तन झालं आहे. दहा वर्षांत तुम्ही जे पाहिलंत तो फक्त ट्रेलर आता पिक्चर बाकी आहे. पुढच्या पाच वर्षांत भारत आणि महाराष्ट्र बदलणार आहे. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शक्ती पीठ महामार्गाची घोषणा
पायाभूत सुविधांची प्रचंड कामं सुरु आहेत. शक्तीपीठ महामार्ग आम्ही आता हाती घेतला आहे. हा महामार्ग परभणीतून जाणार आहे. या महामार्गाच्या दुतर्फा इंडस्ट्रीयल क्लस्टर तयार करणार आहोत, समृद्धी महामार्गामुळे १५ जिल्ह्यांना समृद्धी मिळाली तशी शक्तीपीठ महामार्गामुळे पर्यटन, कृषी यांच्यासाठी महत्त्वाचं योगदान मिळणार आहे. परभणीत विकासाच्या नव्या संधी निर्माण होणार आहोत. शक्ती पीठ महामार्ग हा विकासाची नवी संधी ठरणार आहे. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नरेंद्र मोदींनी जे विकासाचं काम केलं आहे ते प्रत्येकासाठी आहे. एक सक्षम खासदार मिळाला तर परिवर्तन घडू शकतं. इथल्या खासदारांसाठी आम्हीच मतं मागायचो ते निवडून आले की सगळं विसरुन जायचे. महादेव जानकर तुमच्याकडे मतांचं कर्ज मागत आहेत. विकासाच्या व्याजासह ते तुम्हाला परत करतील याची मला खात्री आहे. महादेव जानकरांना मत म्हणजे मोदींना मत असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे वाचा- शिवसेनेच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर, ‘या’ नेत्याचं नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा
जात, धर्म, पंथ न विचारता मोदींनी गरीबांना घरं दिली. पाण्याचं कनेक्शन देताना जात, धर्म विचारला नाही. महादेव जानकरांना मत देणं म्हणजे मोदींना मत देणं आहे हे विसरु नका. मोदींना मत देताना त्यांचं चिन्ह विसरु नका. कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ हे त्यांच्यामागे आहेत. त्यांना चिन्ह मिळालं की आपल्याला निवडून आणायचं आहे. महादेव जानकर हा साधा माणूस आहे त्यामुळे त्यांना निवडून आणा असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.